

खाडीपट्टा : पावसाळा हंगाम नुकताच संपला असून मात्र शेतात परतीच्या पावसाचे पाणी अजून साचून राहिले आहे तसेच भात पीक परिपक्व तयार होत आले असताना खाडीपट्टयात रानडुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून त्यामुळे उभ्या भात पिकाचे नुकसान होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
खाडीपट्टयामध्ये प्रत्यक्ष फेरफटका मारला असता परतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका भात शेतीला पोहोचला असून दसऱ्यानंतर होणारी भात कापणी आता दिवाळी दोन दिवसांवर आली असताना देखील भात कापणीसाठी भाताचे पीक तयार झालेले नाही, काही ठिकाणी भात पीक तयार होत आलेले असले तरी भात पिकाच्या बुंदाजवळ ओलावा अजून तसाच राहिला आहे. तसेच दुसरीकडे कित्येक भात पिकाचे रानडुकरांनी नुकसान पोहोचवले आहे. त्यामुळे यावर्षी भात पीक चांगल्याप्रकारे येईल अशी आशा असताना हाता तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा यावर्षी देखील नुकसानीत जाईल असेच खाडीपट्टयामध्ये चित्र आहे.
सध्या ऑक्टोबर हिट असल्याकारणाने रखरखते ऊन पडत आहे. भात पिकाला पोषक असणारे ऊन पडत असल्याकारणाने भात पिक चांगले तयार होत आहे, मात्र अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने अजूनही चिखल आहे, त्यामुळे भात पीक वरचेवर पिवळे वाटत असले तरीसुद्धा बुंदाजवळ ते हिरवेगार असल्याचे प्रत्यक्षदर्शी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी रानडुकरांचा वावर वाढलेला असून उभ्या पिकाचे नुकसान होत आहे.
एव्हाना भात कापणीचा हंगाम सुरू होणे गरजेचे होते, मात्र मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेला पावसाळा आज मितीस देखील अधून मधून परतीच्या पावसाने नुकसान पोहोचवत असल्याकारणाने शेतकरी राजावर आसमानी संकट कोसळले आहे. यामधून सावरण्याचा अनेक शेतकऱ्यांनी प्रयत्न केलेला आहे, मात्र रानडुकरांचा बंदोबस्त कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत असून झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
कापणीच्या हंगामातच धाड
भात कापणीचा हंगाम एव्हाना सुरू होणे अपेक्षित होते, मात्र परतीच्या पावसाने हैदोस घातल्यामुळे शेतकऱ्यांचे भरमसाठ नुकसान झाले असून आता त्यातून उभारी मिळत असताना हातातोंडाशी आलेला घास रानडुकरांच्या वावरामुळे पिकाचे मोठे नुकसान पोहोचत आहे. भात पिकाच्या होणाऱ्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे व्हावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.
‘खाडीपट्टयात गेल्या अनेक वर्षांपासून वन्य प्राणी भात शेतीला नुकसान पोहचत असून परतीच्या पावसाने केलेले नुकसान त्याचबरोबर आता रानडुकरांनी उभ्या भात पिकावर हैदोस घातला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.’
गणपत मालप, चिंभावे शेतकरी
‘दरवर्षी वन्य प्राण्यांकडून भात तसेच इतर पिकांचे काही प्रमाणात नुकसान होत असते. आम्ही वन्यविभागास कळवले असता ते वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे मागतात. वन्य प्राणी नुकसान करत असतानाचे पुरावे हे शेतकऱ्यांना शक्य नाही,
मारुती बरकडे, कृषी सहाय्यक