

Thane Municipal Corporation Election 2026: ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी (शिंदे गट) दिलासादायक बातमी समोर आली आहे. ठाण्यात शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, निवडणुकीआधीच पक्षाचे खाते उघडले आहे.
प्रभाग क्रमांक 18 क मधून जयश्री फाटक या बिनविरोध निवडून आल्या आहेत. जयश्री फाटक या माजी आमदार रविंद्र फाटक यांच्या पत्नी आहेत. कोणताही विरोधी उमेदवार न राहिल्याने त्यांची निवडणूक बिनविरोध झाली.
प्रभाग क्रमांक 18 क मधून सुखदा मोरेही बिनविरोध विजयी झाल्या आहेत. काँग्रेसच्या उमेदवार वैशाली पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ही जागा शिवसेनेच्या सुखदा मोरे यांच्यासाठी खुली झाली. तसेच मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने सुखदा मोरे यांचा विजय झाला आहे. सुखदा मोरे या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या पत्नी आहेत.
प्रभाग क्रमांक 17-अ मधून एकता भोईर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. या प्रभागात सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे एकता भोईर यांचा विजय झाला आहे.
ठाण्यात शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही आनंदाची बातमी मानली जात आहे. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो आणि या शहरावर आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत.
निवडणूक होण्याआधीच शिवसेनेचे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. मुंबईप्रमाणेच ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, आगामी काळात येथे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.