

ठाणे : भ्रष्टाचाराने पोखरलेल्या ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा मोठा टेंडर घोटाळा समोर आला आहे. पात्र असलेल्या कंपनीला डावलून पात्र नसलेल्या मर्जीतल्या कंपनीला तब्बल २२कोटींचे काम देण्यात आले आहे. संबंधित कंपनीला हे काम मिळावे यासाठी यासाठी पालिकेवर राजकीय दबाव असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे. यासंदर्भात पालिकेच्या उपअभियंत्याच्या विरोधात सुरुवातीला आर्थिक गुन्हे शाखेकडे निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्याचे तक्रार करण्यात आली होती. मात्र आर्थिक गुन्हे शाखेने कोणत्याही प्रकारचा तपास न करता हे प्रकरण ठाणे लाचलुचपत विभागाकडे वर्ग केले आहे.
ठाणे महापालिका भ्रष्टाचाराने किती पोखरली आहे हे शंकर पाटोळे यांच्या प्रकरणानंतर समोर आले आहे. पालिकेचे अधिकारी अशाप्रकारचा भ्रष्टाचार करताना किती निर्वावले आहेत याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. अतिक्रमण विभाग हे भ्रष्टाचाराचे केंद्र असले तरी पालिकेचे इतर विभाग देखील यामध्ये मागे नसल्याचे समोर आले आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने कोलशेत, माजिवडा आणि विटावा या मलप्रक्रिया केंद्रासाठी परिचलन निघा, देखभाल आणि दुरुस्तीसाठी ही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. तब्बल २२ कोटींचे हे काम होते. यासाठी काही कंपन्यांनी निविदा अर्ज देखील भरला होता. यामध्ये तोशिबा आणि एस.एस इन्फ्रा या कंपन्या पात्र देखील ठरल्या होत्या आणि त्यांचा अनुभव सुद्धा होता. मात्र असे असताना या कंपन्यांना डावलून अनुभव नसलेल्या आणि पात्र नसलेल्या मे.ए.के. इलेक्ट्रिकल अँड वर्क्स प्रा.लि या मर्जीतल्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. विशेष म्हणजे निविदा मागवताना वैयक्तिक निविदा मागवण्यात आल्या असताना हे काम मिळवण्यासाठी दुसऱ्या कंपनीसोबत जॉईंट व्हेंचर दाखवून निविदा भरली. आणि ठाणे महापालिकेनेही नियम डावलून या कंपनीला हे काम दिले असल्याचे आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाच्या विरोधात सुरुवातीला आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती. यामध्ये ठाणे महापालिकेचे उपअभियंता गुणवंत झांबरे यांनी निविदेमध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. यासंदर्भात उपअभियंता झांबरे यांची प्रत्यक्ष भेट घेतली असताना अशाप्रकारे कोणताच भ्रष्टाचार झाला नसून सर्व निविदा ही नियमाप्रमाणेच राबवण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रकरण लाचलुचपत विभागाकडे का देण्यात आले ?
निविदा प्रक्रियेत आर्थिक घोटाळा झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असल्याने सुरुवातीला - आर्थिक गुन्हे शाखेने तक्रार करण्यात आली होती. मात्र आर्थिक गुन्हे शाखेने कोणत्याच प्रकारचा तपास केला नाही. तर हे प्रकरण ठाणे लाचलुचपत विभागाकडे का वर्ग करण्यात आले याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.