

ठाणे: मुंब्रा शहरात शनिवारी मध्यरात्री टोरंट पॉवरच्या वीजपुरवठ्याचा फ्यूज उडाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रात्री 12 वाजल्यापासून ते पहाटे सुमारे 2.30 वाजेपर्यंत अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांची झोप उडाली. आधीच असह्य उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना अंधारात आणि घुसमटीच्या वातावरणात रात्र काढावी लागली.
विशेष म्हणजे, वीजपुरवठा खंडित होण्यापूर्वी किंवा त्यानंतर कंपनीकडून कोणतीही अधिकृत सूचना, संदेश किंवा स्पष्टीकरण देण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संतापाची लाट उसळली असून टोरंट पॉवरच्या विरोधात मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंब्र्यातील ठाकुरपाडा, हनुमानजी नगर, शैलेश नगर, मुंब्रा बाजार परिसरासह अनेक भागांतील रहिवाशांनी रात्रीच्या वेळी वीज गायब झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. उष्णतेमुळे घरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागला.
अनेक ठिकाणी पाण्याच्या मोटारी बंद पडल्याने पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाल्याचे नागरिकांनी सांगितले. वीज बिल वेळेवर भरूनही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असेल तर ग्राहकांनी कोणाकडे दाद मागायची? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याची तक्रारही नागरिकांनी केली.
दरम्यान, वीजपुरवठा खंडित होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून टोरंट पॉवरकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून लवकरच विविध सामाजिक संस्था, स्थानिक संघटना आणि नागरिकांच्या वतीने टोरंट पॉवरच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.