Pali Heavy vehicle Traffic Ban: पाली शहरात अवजड वाहनांना बंदी; सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत बंदी घालण्याचे आदेश

नागरिक, भाविकांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आदेश; नगरपंचायतीच्या पाठपुराव्याला यश
Pali Heavy vehicle Traffic Ban
Pali Heavy vehicle Traffic BanPudhari
Published on
Updated on

पाली: अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन रायगड जिल्हाधिकारी किशन न. जावळे यांनी पाली शहरातील सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.

या निर्णयामुळे पालीतील नागरिक, भाविक, विद्यार्थी आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पाली नगरपंचायतीने नागरिकांच्या तक्रारी आणि वाढत्या वाहतूक समस्येची दखल घेत सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक १९७ मंजूर करून अवजड वाहनांवर निर्बंध घालण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या ठरावाच्या अनुषंगाने तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, सुधागड-पाली यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आपले अधिकार वापरत ही अधिसूचना जारी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाली शहरातील मार्गांवर पुढील आदेश होईपर्यंत सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहणार आहे. पाली हे श्री बल्लाळेश्वर गणपतीचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने वर्षभर हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

तसेच स्थानिक नागरिक, शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. शहरातील अरुंद रस्त्यांवरून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी, ध्वनी व वायू प्रदूषण तसेच गंभीर अपघातांचा धोका वाढत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.

आदेशात मात्र जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना दिलासा देण्यात आला आहे. दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला, पाणी आदी अत्यावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, तसेच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका यांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.

या निर्णयामुळे शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना याचा मोठा फायदा होणार आहे. नगरपंचायतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याने पालीकरांमध्ये समाधानाचे वातावरण असून हा निर्णय शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी तातडीने दखल घेऊन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नगरपंचायतीने घेतलेला ठराव आता प्रत्यक्षात उतरला असून हा निर्णय पालीकरांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

- पराग मेहता, नगराध्यक्ष, पाली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news