Gastro Death Kasara | कसारा, फणसपाड्यात गॅस्ट्रोची लागण: चिमुरडीचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक
Kasara Phanspada gastro cases
शाम धुमाळ
कसारा: कसारा जवळील अतिदुर्गम व संपूर्ण आदिवासी असलेल्या फणसपाड्यातील ग्रामस्थांना गॅस्ट्रो ची लागण झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एक चार वर्षीय मुलगी उपचारादरम्यान दगावली असून दोन जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना शहापूर येथील रुग्णालयात दखल करण्यात आले आहे. 30 जण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.
कसाराजवळील फणसपाडा (शिरोळ ) येथील ग्रामस्थांना दोन दिवसांपासून उलटी-जुलाबाचा त्रास होऊ लागला. अनेक ग्रामस्थ खासगी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा, खर्डी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत आहेत. दरम्यान, उपचारादरम्यान वेदिका भस्मा या चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर गॅस्ट्रो सह अन्य आजार उद्भवलेल्या दोन जणांना शहापूर येथे उपचारासाठी दखल करण्यात आले आहे. पाड्यातील 6 हुन अधिक रुग्णावर खर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरु असून 20 हून अधिक रुग्णांवर वैद्यकीय कॅम्प फणसपाडा मध्ये उपचार सुरु आहेत.
दरम्यान, अनेक वर्षांपासून या पाड्यात पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी जलजीवन योजनेचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, अद्याप त्या कामाचा श्री गणेशा न झाल्याने ग्रामस्थांना विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. पाऊस, अस्वच्छता, उताराच्या मार्गाने वाहत जाणारे नाल्याचे पाणी हे विहिरीत जात असल्यामुळे विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. त्यातूनच ही साथ पसरल्याचे बोलले जात आहे. या पाड्यातील लोकांना विहिरी शिवाय दुसरा पर्याय नसल्याने विहिरीतील पाणी जेवणासाठी, अंघोळीसाठी व पिण्यासाठी वापरले जात आहे.
तर तलावातून असलेल्या पाणी योजनेच्या नळाना पाच दिवसांनी अशुद्ध पाणी येत असल्यामुळे गावातील लोक कमी वापर करतात. दरम्यान फणसपाडा येथील ग्रामस्थांसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात एक वैद्यकीय पथक नेमण्यात आले आहे. सर्व घरातील लोकांची तपासणी सुरु केली आहे. दरम्यान, गॅस्ट्रोचे रुग्ण आटोक्यात येत असून कोणीही अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दूषित विहिरीतील पाणी तपासणीसाठी पाठवण्यात आले असून सध्या या विहिरीतील पाणी पिण्यासाठी बंदी घातली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया म्हात्रे, डॉ. आशु शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथक, साथ निर्मूलन पथक वैद्यकीय तपासणीचे काम करत आहेत.
शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील गावपाडे आजही विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. आमच्या पाड्यात पावसाळ्यात साथीच्या रोगांची दाट शक्यता असते. ग्रामपंचायत, पंचायत समितीकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसते. त्यामुळे मान्सूनपूर्व तयारी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे आहे. अशा मृत्यूच्या घटनांमुळे आमचे आदिवासी बांधव पूर्णतः घाबरले असून शासनाने शुद्ध पाणी देण्यासाठी प्रयत्न करावे.
- अनंता धापटे, ग्रामस्थ, फणसपाडा
आम्ही दोन दिवसांपासून गावात सर्व्हे करीत आहोत. आरोग्य अधिकाऱ्यांनीही येथे भेट देऊन पाहणी केली आहे. एक गॅस्ट्रो संशयित रुग्ण दगावला आहे. बाकी रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तालुका आरोग्य विभाग, यावर योग्य त्या उपाययोजना करत असून एक पथक पाड्यात कार्यरत आहे.
डॉ. भाग्यश्री सोनंपिपळे, तालुका आरोग्य अधिकारी, शहापूर

