

शहापूर ः राजेश जागरे
ठाणे जिल्ह्यातील शहापूर व मुरबाड तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या 548 शेतकर्यांचे धानाचे करोडो रुपये आजपर्यंत न मिळाल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.सदर शेतकर्यांच्या भाताचे पैसे तात्काळ त्यांच्या खाती जमा करावेत याबाबत शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार व पदाधिकार्यांनी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेत खरीप हंगाम 2024/2025 मधील मुरबाड - शहापूर तालुक्यातील 548 शेतकर्यांचे धानाचे (भात) पैसे मिळावेत यासाठी चर्चा करून शेतकरी संघर्ष समितीने निवेदन दिले.यावेळी मुरबाड तालुका शेतकरी संघ माजी चेअरमन प्रकाश पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पवार,अशोक पठारे, किसन आलम, विलास घरत उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड व शहापूर तालुक्यात, आदिवासी विभागात,आदिवासी विकास महामंडळाकडून भात (धान) खरेदी होत असते.खरीप हंगाम 2024/ 2025 मध्ये मुरबाड तालुक्यातील धसई केंद्र-43, माळ केंद्र- 236, पाटगाव-28 असे एकूण 307 शेतकरी. शहापूर तालुक्यातील आटगाव केंद्र- 51, मुगाव-81, सापगाव-20, सावरोली- 38, डोळखांब -39, पिवळी-2 असे एकूण 241 शेतकरी भाताच्या पैशापासून वंचित आहेत.
मुरबाड व शहापूर तालुक्यातील एकूण 548 शेतकर्यांचे 12 हजार 152 क्विंटल धानाचे 2 कोटी 79 लाख 49 हजार सहाशे रुपये शासनाकडून आदिवासी विभागाकडे जमा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.मात्र हे धानाचे पैसे अजूनही शेतकर्याला प्राप्त न झाल्यामुळे शेतकरी अडचणीत व चिंतेत आहे.आपले धानाचे पैसे मिळावेत म्हणून दोन्ही तालुक्यातील शेतकरी आदिवासी विकास महामंडळाच्या शहापूर व नाशिक कार्यालयाला भेट देत असतात.
महामंडळाकडे या संबंधी विचारणा केली असता खरीप हंगाम 2024/2025 मध्ये शेतकर्यांनी सातबारावर पीकपेरा नोंद केली नसल्याचे सांगण्यात येते.मुरबाड- शहापूर आदिवासी भागातील शेतकर्यांमध्ये पिक पेरा नोंदी संबंधी जागरूकता नव्हती, काही ठिकाणी नेटवर्कची अडचण होती. अनावधानाने शेतकयांकडून खरीप हंगाम 2024/2025 मध्ये पिक पेरा नोंद सातबार्यावर राहून गेल्याचे हमीपत्र लिहूनही दिले आहे.