

Pedhya Maruti Temple Thane
ठाणे: शहरातील जांभळी नाक्या या प्रसिद्ध व्यापार पेठेतील श्री हनुमानाचे म्हणजेच पेढ्या मारुतीचे मंदिर. केवळ ठाणेकरांसाठी नाही, तर तमाम भाविकांसाठी श्रध्देचे स्थान आहे. त्यामुळे आजच्या हनुमान जयंतीला नाही तर सदासर्वकाळ हे मंदिर भाविकांच्या मांदियाळीने गजबजलेले असते. आजच्या हनुमान जयंती साठी दरवर्षीप्रमाणे हजारो भाविकांच्या गर्दीने हे मंदिर आणि परिसर फुलून जाणार आहे.
जांभळी नाका हा शहरातील कपडे, भांडी, किराण्यासह अनेक वस्तूंची मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे कायम गजबजलेल्या या बाजारपेठेत येणारे हजारो भाविक ग्राम दैवत श्री कौपिनेश्वराचे जसे दर्शन घेतात, तसेच प्रसिध्द पेढ्या मारूतीच्या दर्शनालाही आवर्जून येतात. पेढ्या मारूती... मंदिराचे नावातच वेगळेपण आहे... या मारूतीला पेढ्या मारूती हे नाव पडण्याची गोष्टही मजेदार आहे. पुण्यातील विविध देवस्थानची नावे जसे लक्ष वेधून घेतात, तसेच ठाण्याचे पेढ्या मारूती केवळ नावाने नाही तर मूर्तीमुळे भक्तांचे लक्ष वेधून घेतात.
पेढ्या मारुतीची मूर्ती मातीची असून ती स्वयंभू आहे. ही मूर्ती सुमारे ४२८ वर्षे जुनी आहे. मूर्तीची उंची सुमारे ४ फूट आणि रुंदी अडीच फूट आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख असून जन्मत:च सूर्याला गिळण्यासाठी तोंड उघडलेले असे तिचे वैशिष्ट्य आहे. अशी मूर्ती इतरत्र क्वचितच आढळते. १९३६-३७ च्या सुमारास मंदिराभोवतालचा परिसर "रामदासवाडी" म्हणून ओळखला जाऊ लागला. महंत दामोदरदास रामदास हे मंदिराचे मुख्य मालक होते.
त्या वेळी मंदिर बांधण्यासाठी एका व्यापाऱ्याकडून उसने पैसे घेण्यात आले होते. मंदिराचे काम लवकर पूर्ण झाल्यास मारुतीला मावा भरविण्याचा नवस करण्यात आला होता. त्यानुसार काम पूर्ण झाल्यावर मारुतीच्या तोंडात पेढे भरविण्यात आले. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली तेव्हापासूनच या मारूतीला पेढ्या मारूती असे संबोधले जावू लागले.
आजही अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून मारुतीला पेढे अर्पण करतात. साधारणपणे अर्धा किलोपर्यंत पेढे तोंडात भरले जातात. मारुतीला तेल, रुईच्या पानांचा हार आणि नारळ फोडण्याची प्रथा सर्वत्र आहे, पण येथे एक वैशिष्ट्य आहे—मूर्ती मातीची असल्याने येथे तेल लावले जात नाही. त्याऐवजी तुपामध्ये शेंदूर लावला जातो. हे या मंदिराचे वेगळेपण आहे.
गेल्या २१ वर्षांहून अधिक काळ विजय पंडित कुलकर्णी हे या मंदिराचे पुजारी म्हणून कार्यरत आहेत. श्रावण महिन्यात आणि सणांच्या काळात सत्यनारायण पूजा, लघुरुद्र यांसारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या मंदिरात कोणत्याही धार्मिक कार्यासाठी सक्तीने वर्गणी किंवा देणगी घेतली जात नाही. भाविकांकडून मिळणाऱ्या स्वेच्छा देणगीतूनच मंदिराचा खर्च भागविला जातो.
मंदिर खासगी असून अलीकडेच त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराचे बांधकाम आकर्षक असून येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या वेळी सुमारे १० हजार भाविक उपस्थित असतात. श्रावण महिन्यातील शनिवारी आणि इतर सणांच्या दिवशी दर्शनासाठी मोठी गर्दी होते.