Thane Illegal Construction : मानपाडा-माजिवडा प्रभागात अनधिकृत इमारतींचे पेव!

अतिक्रमण उपायुक्त अनभिज्ञ की कानाडोळा? सात मजली तीन इमारतींची बांधकामे सुरू; कारवाईची मागणी
Thane Illegal Construction
Thane Illegal Constructionpudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे शहर : सुरेश साळवे

ठाणे महापालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका बाजूला अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू असल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे बाळकूम-ढोकाळी आणि कळवा परिसरात सात मजली तीन अनधिकृत इमारतींची बांधकामे युद्धपातळीवर सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वारंवार तक्रारी करूनही संबंधित बांधकामांवर कारवाई होत नसल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या बांधकामांप्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम (एमआरटीपी) अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्या प्रियांका शाद यांनी लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

Thane Illegal Construction
Thane Robbery Case : दिव्यातील दरोड्याचा छडा; पाच जणांना बेड्या

ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात यापूर्वीही शासकीय भूखंडांवर गाळे बांधून त्यांना संरक्षण दिल्याचा आरोप झाला होता. संबंधित गाळ्यांची विक्रीही करण्यात आली; मात्र त्यावर ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती आहे. त्यातच आता याच प्रभाग समिती क्षेत्रात नव्याने अनधिकृत इमारतींची बांधकामे सुरू असल्याचा मुद्दा पुढे आला आहे.

बाळकूम-ढोकाळी रोड परिसरात तळमजला अधिक सात मजल्यांच्या एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. दुसरी इमारत ढोकाळी गाव रोडवरील गोकर्ण इमारतीजवळ उभी राहत आहे. या इमारतीचेही तळमजला अधिक सात मजल्यांचे बांधकाम सुरू असल्याचा आरोप आहे. तर तिसरी इमारत कळव्यातील आझाद धाऊन, खारेगाव परिसरात बांधली जात आहे. या तिन्ही बांधकामांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

Thane Illegal Construction
Thane Kalyan Dombivli Connectivity : ठाणे-डोंबिवलीला मिळणार जलद मार्ग

अनधिकृत इमारतींमध्ये नागरिकांनी आयुष्यभराची कमाई गुंतवून सदनिका खरेदी केल्यास भविष्यात मोठी आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. तसेच बांधकामांच्या सुरक्षिततेबाबत योग्य तपासणी न झाल्यास दुर्घटनांचा धोकाही नाकारता येत नाही. भविष्यात अशा इमारतींवर तोडक कारवाई झाल्यास सदनिकाधारकांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे बांधकामे सुरू असतानाच महापालिकेने हस्तक्षेप करून त्यांची वैधता तपासावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रियांका शाद यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.