Thane Robbery Case : दिव्यातील दरोड्याचा छडा; पाच जणांना बेड्या

२०० सीसीटीव्ही फुटेज तपासून टोळीचा माग; मुख्य आरोपीवर १८ गुन्हे, चार साथीदार फरार
Thane Robbery Case
Thane Robbery Casepudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे शहर : दिव्यातील तुकाराम मुंडे यांच्या बंगल्यावर केअरटेकरचे हातपाय बांधून टाकलेल्या धाडसी दरोड्याचा ठाणे गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या चौकशीत सात गुन्हे उघडकीस आले आहेत. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तब्बल १५० ते २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. अटक केलेल्या टोळीचा मुख्य सूत्रधार विजय चव्हाण याच्यावर यापूर्वी दरोडा, घरफोडी आणि चोरीचे १८ गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

१९ नोव्हेंबर २०२६ रोजी दिव्यातील तुकाराम मुंडे यांच्या बंगल्यात आठ ते नऊ दरोडेखोरांनी प्रवेश केला होता. बंगल्याच्या शौचालयाच्या खिडकीची ग्रील तोडून आत शिरलेल्या दरोडेखोरांनी झोपलेल्या केअरटेकर संतोष शेडगे यांना स्क्रू ड्रायव्हरचा धाक दाखवून त्यांचे हातपाय बांधले. त्यानंतर बंगल्यातील एक लाख ५५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ८४ हजार रुपयांची रोकड, असा एकूण दोन लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज लुटून ते पसार झाले होते.

Thane Robbery Case
Bhiwandi Food Poisoning : भिवंडीत शोरमाचा विळखा! विषबाधितांचा आकडा ८० वर

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या निर्देशानुसार मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. कल्याण गुन्हे शाखा घटक क्रमांक तीनच्या पथकाने घटनास्थळापासून सीएसएमटी ते बदलापूर आणि कसारा रेल्वे मार्गावरील सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.

तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याच्या आधारे संशयितांची ओळख पटवून मुख्य आरोपी विजय तुळशीराम चव्हाण (४५), लक्ष्मण उमाजी भोसले (४३), सतीश सुरेश वाघे (२७), नारायण रघुनाथ ठोंबरे (२७) आणि जयेश सुरेश कथोरे (३५) या पाच जणांना ताब्यात घेतले. यातील लक्ष्मण भोसले याने दरोड्यापूर्वी रेकी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. टोळीतील अन्य चार आरोपींची ओळख पटली असून ते फरार आहेत.

Thane Robbery Case
Thane Kalyan Dombivli Connectivity : ठाणे-डोंबिवलीला मिळणार जलद मार्ग

जामिनावर सुटताच पुन्हा गुन्हेगारी

अटक केलेले पाचही आरोपी यापूर्वी दरोड्याच्या गुन्ह्यात अटकेत होते. सहा महिन्यांपूर्वीच ते जामिनावर बाहेर आले होते. मुख्य आरोपी विजय चव्हाण आणि त्याच्या साथीदारांच्या चौकशीत कुळगाव, कल्याण तालुका, वाशिंद आणि पडघा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सात गुन्ह्यांची उकल झाली आहे. विजय चव्हाण याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत दरोडा, घरफोडी आणि चोरीचे १८ गुन्हे दाखल आहेत. नारायण ठोंबरे याच्यावरही कुळगाव पोलीस ठाण्यात २०२५ मध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. अटक आरोपींना पुढील तपासासाठी मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. फरार चार आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.