

ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारीत रेल्वे स्टेशन आणि मनोरुग्णालयाची विस्तारीत इमारत बांधण्यासाठी वृक्षतोड केली जाणार आहे. या परिसराची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सोमवारी केली. या पाहणीत हरकती येण्यापूर्वीच शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचे उघडकीस आले. ही वृक्षतोड करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह डोळेझाक करणाऱ्या ठाणे पालिकेच्या वृक्षप्राधिकरण अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मनोज प्रधान यांनी केली.
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील एक हजार 614 वृक्षांपैकी 724 वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या प्रस्तावात 303 वृक्ष थेट तोडण्याची, तर उर्वरित 421 वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची नोंद आहे. पुनर्रोपणाचे ठिकाण, देखभाल आणि जगण्याचे प्रमाण याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही. या वृक्षांमध्ये फणस, कैलासपती, अशोक, आंबा, बदाम, शेवगे, नारळ, ताड, साग, भोकर, कांचन, अनंता, बेहरी माड, कडुलिंब, चाफा, उंबर यासांरख्या विविध वृक्षांचा सामावेश आहे. या संदर्भात मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, मकसूद खान, राजेश साटम , दीपक क्षत्रिय आदी कार्यकर्त्यांनी प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील पाहणी केली. तसेच, या पाहणीनंतर अधीक्षक नेताजी मुळीक यांची भेट घेऊन निवेदन दिले.या पाहणीमध्ये अनेक ठिकाणी आधीच वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास आले. अतिशय जुनी झाडेही तोडण्यात आली असल्याचे यावेळेस दिसून आले.
या संदर्भात मनोज प्रधान म्हणाले की, देशातील सर्वात मोठे मनोरुग्णालय या ठिकाणी उभे राहणार आहे. किंवा रेल्वेचे विस्तारीकरण होणार आहे, याचे आम्हाला कौतूक आहेच. किंबहुना, विकासाचे आम्ही स्वागतच करीत आहोत. पण, शहरात उरलेली शेवटची वनराई नष्ट करण्यात येत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे, याबाबत विचारणा केल्यानंतर ठाणे पालिकेचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. 24 नोव्हेंबरला वृक्षतोड करण्याबाबत हरकती मागविल्या जात आहेत आणि त्या आधीच झाडे तोडली जात आहेत. झाडाच्या फांद्या तोडायच्या असतील तरी परवानगी घ्यावी लागते. इथे परवानगीच्या आधीच कत्तल करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ओक यांनी झाडे तोडणे हे खुनासारखेच आहे, असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय असताना जर वृक्षतोड होत असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, या संदर्भात आपण पोलीस ठाण्यात पत्र देणार आहोत, असेही प्रधान म्हणाले.
हा परिसर म्हणजे ठाण्याचे फुप्फुस...
सबंध ठाणे उजाड झालेले असताना फक्त याच परिसरात हिरवळ आहे. आज ठाण्याचा प्रदूषण मानक दर 160 च्या घरात आहे. त्यामुळे ठाण्याला ऑक्सिजन पुरवणारा हा परिसर म्हणजे शहराचे फुप्फुस असताना ते उजाड केले तर किती धोक्याचे होईल? याचा विचार करून ठाणेकर नागरिकांनीच रस्त्यावर उतरावे. ठाणेकर पर्यावरण प्रेमींच्या नेतृत्वात आम्ही झाडे वाचविण्यासाठी रस्त्यावर येऊ, असेही मनोज प्रधान म्हणाले.