

Widespread cutting of trees with the lure of money. Negligence of forest department officials, demand for action
परतूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू असून, खुद्द शहरातील लाकडी सॉ मिल या हरित गुन्ह्याला प्रोत्साहन देत असल्याने वन्यप्रेमी आणि पर्यावरण प्रेमीमध्ये संतापाचे वातावरण आहे. याकडे वनविभागाचे अधिकारी यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. अवैध वृक्षतोडप्रकरणी कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत आहे.
ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लाकडाची तस्करी करून ती परतूर शहरात आणली जाते आणि येथे सर्रासपणे त्याची कटाई करून विक्री केली जाते. विशेष म्हणजे, सामाजिक वनिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे या संपूर्ण प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा थेट आरोप वन्यप्रेमींकडून केला जात आहे. परतूर शहर हे आता केवळ तालुक्यातूनच नव्हे, तर बाहेरच्या तालुक्यांतून लाकूड वाहतुकीचे एक मोठे केंद्र बनले आहे.
या लाकडी तस्करीचे सर्वात मोठे लक्ष्य ग्रामीण भागातील शेतकरी आहेत. पैशाचे आमिष दाखवून आणि त्वरित आर्थिक गरज भागवण्याचे कारण पुढे करत वृक्षतोड माफियांनी शेतकऱ्यांच्या बांधावरील जुनी, मोठी आणि मौल्यवान झाडे, विशेषतः लिंबाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू केली आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. लाकूड तोडणारे माफिये रातोरात झाडे कापून, त्याची बेकायदा वाहतूक करून परतूर शहरातील सॉ मिलपर्यंत पोहोचवतात.
या सॉ मिलमध्ये दिवसाढवळ्या या अवैध लाकडाची कटाई केली जात असतानाही, वनिकरण विभागाकडून कोणतीही चौकशी किंवा कारवाई होताना दिसत नाही. या सॉ मिलमध्ये बाहेरून आ-लेले लाकूड आणि त्यांच्याकडे असलेल्या लाकडी साठ्याच्या नोंदी याची तपासणी करणे आवश्यक आहे, तरीही अधिकारी याकडे डोळेझाक करत आहेत.
सामाजिक वनिकरण विभागाच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वनिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर या लाकडी माफियांना अभय दिल्यामुळेच वृक्षतोडीचा हा खेळ शहराच्या वेशीवर खुलेआम सुरू आहे, असा थेट आरोप वन्यप्रेमी संघटनांनी केला आहे.
शहरातील सर्व लाकडी सॉ मिलवर तातडीने छापे टाकून अवैध लाकडी साठा जप्त करण्याची आणि या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या वनिकरण विभागाच्या संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.