Beed-Parli road : बीड-परळी मार्गावर अकराशे झाडांची होणार कत्तल
Thousand of trees will be cut down on the Beed-Parli road
बीड, पुढारी वृत्तसेवा जिल्हा प्रशासन आज पालकमंत्र्यांच्या हस्ते तीस लाख झाडे लावण्याच्या मोहिमेला प्रारंभ करणार आहे. दुसरीकडे बीड ते परळी मार्गावर जरूड फाटा ते सिरसाळा या दरम्यान तब्बल अकराशे झाडांवर कुन्हाड चालवली जाणार आहे. या मार्गावर वडाची मोठमोठी झाडे होती ती आता रुंदीकरणाच्या बुलडोझरखाली जाणार असून नव्याने रस्ता झाल्यानंतर तोडलेल्या झाडांपेक्षा अधिक झाडांची लागवड करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी वृक्षप्रेमीमधून केली जात आहे.
बीड जिल्ह्यात वनक्षेत्र कमी आहे, त्याबरोबरच वृक्षलागवडही कमी आहे. बीड जिल्ह्यात पावसाची अनियमितता असल्याचे कारणही हेच सांगितले जाते. अशा वेळी आहे ती वृक्ष संपदा जगली पाहिजे, याबरोबरच नव्याने वृक्ष लागवड झाली पाहिजे याकरिता प्रशासकीय व सामाजिक पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.
यादरम्यानच जरुड फाटा ते सिरसाळा रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. या रुंदीकरणात तब्बल अकराशे झाडांवर कुन्हाड चालवावी लागणार आहे. रुंदीकरणाचे काम गरजेचे आहे, अशा स्थितीत वृक्षतोड होणे अपरिहार्य आहे. परंतु वर्षानुवर्षे सावली देणारे हे वृक्ष तोडले जात असल्याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्याचे रुंदीकरण होताना लहान मोठे तब्बल अकराशे वृक्ष तोडले जाणार असून आता काम पूर्ण झाल्यानंतर आहे त्यापेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यासाठी वृक्षप्रेमींनी पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पंधरा मीटरवर लावणार झाडांच्या फांद्या
बीड ते परळी मार्गावर जरुड फाटा ते सिरसाळा या दरम्यान रुंदीकरणाच्या कामाकरिता अकराशे झाडे तोडली जाणार आहेत, आतापर्यंत जवळपास दीडशे झाडे तोडली असली तरी तोडलेल्या झाडांच्या संख्येपेक्षा अधिक झाडे लावली जाणार आहेत. यातील वडाच्या झाडांच्या मोठमोठ्या फांद्या प्रत्येक पंधरा मीटरवर लावल्या जाणार असून रस्ता पूर्ण होईपर्यंत या फांद्याची काळजी घेऊन संवर्धनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याबरोबरच इतर ठिकाणीही वृक्ष लागवड केली जाणार असल्याची माहिती अभियंता राजेंद्र भोपळे यांनी दिली.
मोठ्या गावांमध्ये होणार चौपदरी रस्ता
बीड ते परळी रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून परळी ते सिरसाळा व बीड ते जरुड फाटा यादरम्यान रस्ता पूर्ण झाला आहे. उर्वरित कामही केले जात असून यामध्ये वडवणी शहरात सव्वादोन किलोमीटर, तेलगावमध्ये पावणेदोन किलोमीटर तसेच घाटसावळीसारख्या मोठ्या गावांमध्ये चौपदरीकरण केले जाणार असल्याने वाहतुकीची कोंडी टळणार आहे.

