

ठाणे : लग्नाच्या हॉलमध्ये घडलेल्या अग्नीकांडानंतर 25 ते 30 लाख लोकसंख्या असलेल्या ठाणे शहराच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धक्कादायक म्हणजे शहराची सुरक्षा आणि सुविधेची जबाबदारी असलेल्या ठाणे पालिकेच्या मुख्यालयाची अग्निसुरक्षा वाऱ्यावर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दररोज हजारो नागरीकांची ये - जा असलेल्या मुख्यालयातील फायर एस्टींगेशर सिलेंडरची एक्सपायरी होऊन सहा महिने उलटले असल्याने अग्निसुरक्षेची ऐशी की तैशी झाली आहे.
घोडबंदर येथे लग्न समारंभाचे रिसेप्शन सुरू असताना आग लागली आणि त्यानंतर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. तब्बल 4 हजार कोटींचे बजेट असलेली ठाणे महापालिका अग्निसुरक्षेबाबत निद्रिस्त असल्याचे समोर आले आहे. ठाण्यात तारांगणमध्ये लागलेल्या आगीमध्ये अग्निशमन जवान गमावल्यानंतरही प्रशासनाचे डोळे उघडलेले दिसत नाहीत. ठाणे महापालिका मुख्यालयातील प्रत्येक मजल्यावर अग्नीसुरक्षेसाठी बसवण्यात आलेली अग्निशमन यंत्र कालबाह्य झाल्याचे दिसत आहेत.
दोन तर ठिकाणी 2012 साली बसवलेले एस्टींगेशर सिलेंडर आहेत. तर खुद्द पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनाकडे जाणाऱ्या पेसेजमध्ये सिलेंडरची कालमर्यादा संपुन अनेक महिने उलटले आहेत. तेव्हा,आग अथवा एखादी दुर्घटना घडून जीवित अथवा वित्तहानी झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न ठाणेकरांनी केला आहे.
सुसंस्कृत ठाण्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक
ठाणे महापालिका प्रशासन, अग्निशमन दल, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क खात्यासह पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे शहरातील अनेक आस्थापनांमध्ये अग्नितांडव होण्याची भीती आहे. येत्या काळात नववर्ष स्वागतादरम्यान होणाऱ्या पार्ट्यामध्ये देखील अग्नितांडव घडू शकते. तेव्हा, सर्तकता बाळगत तत्काळ या आस्थापनांवर कारवाई करावी. सुसंस्कृत ठाण्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई आवश्यक आहे.