

मुंबई : अमली पदार्थांच्या रॅकेटसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राजकीय हेतूने आरोप केले जात आहेत. सातारा ड्रग्जप्रकरणी शिंदे किंवा त्यांच्या परिवाराचा दुरान्वयेही संबंध नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
मुंबईत वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सातारा ड्रग्जप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर फडणवीस यांनी भाष्य केले. सातारा जिल्ह्यात अमली पदार्थांच्या टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले.
तसेच, या प्रकरणात राजकीयदृष्ट्या आणि जाणीवपूर्वक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव जोडण्याचा प्रयत्न केला जात असून, हा प्रकार अत्यंत चुकीचा आणि निषेधार्ह आहे. आतापर्यंत झालेल्या तपासात पुढे आलेल्या पुराव्यांनुसार या प्रकरणात उपमुख्यमंत्री शिंदे अथवा त्यांच्या परिवाराचा कुठलाही संबंध समोर आलेला नाही. त्यामुळे दुरान्वयेही शिंदे यांचा या प्रकरणाशी संबंध नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून, खात्यांची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.