

ठाणे : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ठाणे, भिवंडी-निजामपूर, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तांनी मनाई आदेश लागू केले आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून, 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे. 2 जानेवारी 2026 ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, 3 जानेवारीरोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करून अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
15 जानेवारी रोजी मतदान होणार असून,16 जानेवारी रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी झेंडे, बॅनर्स, कापडी फलक, पोस्टर्स, कटआउट्स, कमानी तसेच घोषणांचा वापर केला जातो.
अनेक वेळा यामुळे सार्वजनिक रस्त्यांवर दोऱ्या, काठ्या किंवा इतर साहित्य लावले जाऊन रहदारीस अडथळा निर्माण होतो. तसेच अशा कारणांवरून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता असते.
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि जनजीवन सुरळीत राहावे यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर परिमंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महानगरपालिका हद्दीत मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. तसेच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण होईल, तसेच उजेड व हवा अडवली जाईल अशा प्रकारे बॅनर्स, फलक, झेंडे किंवा तत्सम साहित्य लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
कारवाई होणार
हा मनाई आदेश दिनांक 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून ते 16 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत किंवा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. सदर आदेशाच्या प्रती निवडणूक क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी लावून तसेच ध्वनीक्षेपकाद्वारे जनतेपर्यंत प्रसारित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जागामालकाची लेखी परवानगी बंधनकारक
खासगी इमारत किंवा आवारात प्रचार साहित्य लावायचे असल्यास संबंधित जागा मालकाची लेखी परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. यासोबतच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्यास देणे आणि ‘ना हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त करणे आवश्यक राहील. खासगी जागेवर लावलेले प्रचार साहित्य रहदारीस अडथळा ठरणार नाही किंवा उजेड व हवा अडवणार नाही, याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील.