

ठाणे : भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या अतिक्रमण विभागासाठी गेले अनेक महिन्यांपासून पालिका अधिकार्यांमध्ये लॉबिंग सुरु असल्याची पालिका वर्तुळात चर्चा होती. अतिक्रमण विभाग मिळावा, यासाठी पालिका अधिकारी बड्या राजकीय नेत्याचे उंबरठे देखील झिजवत असल्याची दबक्या आवाजात चर्चा असून उपायक्त शंकर पाटोळे यांच्याकडून अतिक्रमण विभाग काढून घेण्यासाठी देखील प्रयत्न सुरु होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान पाटोळे मुंबई एसीबीच्या जाळ्यात अडकल्यानंतर आता अतिक्रमण विभाग आपल्याकडे घेण्यासाठी अधिकारी वर्गात जोरदार हालचाली सुरु असून आता पालिका आयुक्त काय भूमिका घेणार याकडे अधिकारी वर्गाचे लक्ष लागले आहे.
नौपाडा भागात केवळ तीन अतिक्रमित गाळे काढण्यासाठी 60 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकलेले अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या अटकेनंतर महापालिकेचा अतिक्रमण विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरणच आहे, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. उपायुक्त शंकर पाटोळे यांना अटक केल्यामुळे अतिक्रमण विभागात भ्रष्टाचाराची मुळे किती खोलवर गेली आहेत हे समोर आले असून याच विभागाचा ताबा घेण्यासाठी यापूर्वी अधिकार्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरु असल्याची चर्चा आहे.
यासाठी खाडीच्या पलिकडे असलेल्या मुंब्रा, कळवा आणि दिवा भागात अनधिकृत बांधकामांचे पेव सुटले होते. या बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी, ते बांधकामे वाचविण्यासाठी राजकीय आणि अधिकारी स्तरावर जोरदार प्रयत्न झाले. यामध्ये राजकीय आशीर्वादाने अधिकार्यांनी मोठ्या प्रमाणात माया देखील जमवली. त्यामुळे अतिक्रमण विभाग ज्या अधिकार्याला मिळेल तो अधिकारी नशीबवान, असे समीकरणच गेल्या काही वर्षांमध्ये झाले आहे. हा विभाग आपल्या ताब्यात घेण्यासाठी ठाणे महापालिकेतील अधिकार्यांमध्ये दोन गट पडून कोल्ड वॉर सुरु असल्याचेही पालिकेत चित्र निर्माण झाले होते.
धाडीमध्ये अनेक गोष्टी समोर येणार
ठाण्यात मोठ्या प्रमाणात उभ्या राहिलेल्या बेकायदा इमारतींमुळे पालिकेचे आणि विशेष करून अतिक्रमण विभागाचे अधिकारी चौकशीच्या फेर्यात अडकले होते. शंकर पाटोळे यांचे नाव तर यामध्ये आघाडीवर होते. त्यानंतर पाटोळे यांच्यावर एसीबीने टाकलेल्या धाडीमध्ये अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिक्रमण विभाग मिळवण्यासाठी अधिकारी वर्गात सुरु असलेली लॉबिंग किमान हे वादळ शांत होईपर्यंत थंडावली असून हा विभाग आता आपल्याकडे घेण्यासाठी अधिकारी देखील धास्तावले आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त आता हा विभाग कोणाकडे सोपवणार याकडे अधिकारी वर्गाचे लक्ष लागले आहे.