

मिरा रोड : काशीगाव पोलीस ठाणे हद्दीत राहणार्या इसमाला सायबर लुटारूंनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगून चांगला नफा देण्याचे आमिष दाखवले. या इसमाला पैसे गुंतवणूक करण्यास सांगून 66 लाख 71 हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काशीगाव येथील विनयनगर जेपी नॉर्थ सिटी मध्ये राहणारे समीर इसाक खलिफे (51) हे मुंबई येथील एका कार्यालयात नोकरीला आहेत. खलिफे यांना मार्चमध्ये अनोळखी मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्स अॅपवर मॅसेज आला. मॅसेज मध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास प्रतिमहिना 200 टक्के फायदा मिळवुन देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यासाठी व्हॉट्स अॅप ग्रुप जॉइन करण्यास सांगण्यात आले.
खलिफे हे व्हॉट्स अॅप ग्रुप जॉइन झाल्यानंतर त्यांना ग्रुपमधील ईतर सदस्यांचा नफा दाखवण्यात आला. त्यावर विश्वास ठेवून थोडेथोडे करून खलिफे यांनी 66 लाख 71 हजार 217 रुपये गुंतवले. काही दिवसांनी त्यांच्या खात्यावर नफा म्हणून दोन कोटी 77 लाख 56 हजार रुपये दिसून आले. त्यांनी ते पैसे मकाढण्याचा प्रयत्न केला असता ते पैसै काढता येत नव्हते.
याबाबत त्यांनी संबंधित इसमांना संपर्क केला असता त्यांना आणखी पैसै गुंतवण्यास सांगण्यात आले. यावरून त्यांची फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यामुळे समीर खलिफे यांनी काशीगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी गुरूवारी कशीगाव पोलीस संजना, अजय केडिया, आकाश बंसल या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक संजय पुजारी हे करत आहेत.