

Dombivli Minor Marriage Prevented
डोंबिवली : अल्पवयीन असताना सोशल ॲपवरील व्हिडिओच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. भिवंडीत राहणाऱ्या तरूणाचे डोंबिवलीकर तरूणीशी जवळपास वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. १८ वर्षे पूर्ण होताच तरूणाने तिच्याशी लग्न करण्याचे ठरविले. लग्नासाठी काझी आणि साक्षीदार पोहोचले.
मात्र, आयत्यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी धडक दिली. प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. अखेर या प्रकरणात अरमान शेख नामक तरूणाला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात पोक्साे कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरूणी डोंबिवलीतील एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.
डोंबिवलीत राहणारी तरूणी मध्यवर्गीय कुटुंबातील आहे. बीएच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणारी ही तरूणी शुक्रवारी भिवंडीत गेली होती. शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अरमान शेख नावाच्या तरूणासोबत ती लग्न करणार होती. अरमानने मुस्लिम पद्धतीने लग्न करण्यासाठी सगळी तयारी करुन ठेवली होती. काझी आणि साक्षीदार या लग्नासाठी हजर झाले होते.
या घटनेची माहिती कळताच हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लग्नाच्या ठिकाणी धाव घेतली. या कार्यकर्त्यांनी लग्नाला हरकत घेतली. हिंदू धर्माच्या मुलीशी लग्न करतो, यावरून प्रचंड गोंधळ झाला. अखेर हे प्रकरण शांतीनगर पोलिस ठाण्यात पोहोचले. मात्र हे प्रकरण डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिस ठाण्याशी संबंधित असल्याने शांतीनगर पोलिसांनी बोहल्यावर चढण्याआधीच दोघा तरूण/तरूणीला विष्णूनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.
ब्लॅकमेल करून लग्नासाठी तगादा
अखेर या प्रकरणात पीडित तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांनी अरमान शेख याच्या विरोधात अल्पवयीन असलेल्या तरूणीला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. व्यवसायाने टेलर असलेल्या अरमान शेख याने आधी या तरूणीशी मैत्री केली. त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शिवाय ब्लॅकमेल करून लग्नासाठी तगादा लावल्याचा आरोप सदर तरूणीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून अरमान शेख याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.