

डोंबिवली : ज्या हातांनी मायेने आधार द्यायचा, त्याच हातांनी विश्वासघाताने घराची तिजोरी रिकामी केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. आयकर विभागातून सेवानिवृत्त झालेल्या एका ७१ वर्षीय वृद्ध आजींच्या देखभालीसाठी ठेवलेल्या 'केअरटेकर' महिलेने त्यांच्या हतबलतेचा फायदा घेत तब्बल ५ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवजी चोरून नेला आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मधुरा विद्याधर बुधकर या डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदान परिसरात राहतात. गेल्या वर्षी जून महिन्यात त्यांना हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याने हालचाल करणे कठीण झाले होते. या काळात त्यांची देखभाल करण्यासाठी कैलासनगर येथील एका ४० वर्षीय महिलेची केअरटेकर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दररोज रात्री १० ते सकाळी ८ या वेळेत ही महिला आजींच्या घरी वास्तव्यास असे. आजींच्या शारीरिक व्याधींचा आणि असमर्थतेचा गैरफायदा घेऊन या महिलेने चोरीचा डाव रचल्याचा संशय व्यक्त होत आहे.
प्रकृती सुधारल्यानंतर गेल्या महिन्यात आजींनी कपाटातील तिजोरी उघडली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. तिजोरीतील सोन्याची बांगड्या आणि पाटल्या गायब होत्या. अधिक तपास केला असता, सोन्याची अंगठी आणि माळेच्या जागी हुबेहूब दिसणारे बनावट दागिने ठेवल्याचे निदर्शनास आले. मुलाच्या मदतीने सोन्याची शहानिशा केली असता दागिने नकली असल्याचे स्पष्ट झाले. चोरीचा प्रकार उघड होताच संबंधित केअरटेकर महिलेने ‘पोलिसात तक्रार करू नका, मी दागिने परत भरून देते,’ असे आमिष दाखवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दागिन्यांच्या चोरीनंतर आजींच्या बँक खात्यातूनही रक्कम गायब होऊ लागली. डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या दरम्यान आजींच्या नकळत एटीएममधून ३ लाख ६१ हजार रुपये काढण्यात आले. दुखापतीच्या काळात मदतीला जाताना केअरटेकर महिलेने आजींच्या एटीएमचा पिन कोड चोरून पाहिला होता. आजींच्या पाकिटातून गुपचूप कार्ड काढून ही महिला पैसे काढत असे आणि संशय येऊ नये म्हणून आजींच्या मोबाईलवर येणारे बँकेचे मेसेज तत्काळ 'डिलिट' करत असे, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाच्या घरात झालेली ही धाडसी चोरी डोंबिवलीत चर्चेचा विषय ठरली आहे. घरात काम करणाऱ्या नोकरांची किंवा काळजीवाहू व्यक्तींची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्यांना घरातील गोपनीय गोष्टी, विशेषतः बँकेचे पासवर्ड सांगू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विष्णूनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.