

भिवंडी: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, सभासद आणि सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाची संस्था होती मात्र बँकेच्या कारभारात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारांमुळे हा विश्वास डळमळीत झाला आहे. असा आरोप बँकेचे सलग दहावर्ष अध्यक्षपद भूषविलेले माजी अध्यक्ष तथा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आर.सी.पाटील यांनी केला आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बँकेच्या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबाबत आयोजित पत्रकार परिषद मध्ये ते बोलत होते. यावेळी संचालक मंडळ उमेदवार सत्यवान पाटील, मतदार भगवान ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित भ्रष्टाचार व आर्थिक अनियमिततेच्या गंभीर प्रकरणाबाबत जनतेसमोर भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेत असल्याचे स्पष्ट करताना आर.सी.पाटील यांनी भ्रष्टाचार व नोकर भरती संदर्भात अनेक तक्रारी न्यायालयात असताना व मतदार यादी निकोप केली नाही तसेच पालघर जिल्हा वेगळा होऊन 11 वर्षे झाल्यानंतरही ठाणे व पालघर असे बँकेचे विलगीकरण केले नाही त्यामुळे बँकेची निवडणूक घाईघाईत घेणे चुकीचे आहे अशी भूमिका आर सी पाटील यांनी या पत्रकार परिषदेत मांडली.
बँकेच्या मागील सर्व आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे. दहा वर्षात झालेल्या नोकरभरती प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून यात दोषी आढळणाऱ्या अधिकारी, संचालक व संबंधित व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत. बँकेच्या ठेवीदार,सभासदांच्या हिताचे संरक्षण करण्यात यावे. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आमचा लढा भ्रष्टाचाराविरोधात
सहकार क्षेत्र ही महाराष्ट्राची ताकद आहे. काही मोजक्या व्यक्तींच्या चुकीमुळे संपूर्ण सहकार चळवळीची प्रतिमा खराब होऊ नये.त्यामुळे या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
आमचा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून भ्रष्टाचाराविरोधात आहे. शेतकरी, सभासद आणि ठेवीदारांच्या पैशाचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे अशी मागणी शेवटी माजी अध्यक्ष आर सी पाटील यांनी केली.