

बदलापूर : शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक हेमंत चतुरे यांच्यावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या बदलापूर पश्चिम शहराध्यक्ष तेजस उर्फ बंटी म्हसकर आणि त्यांच्या साथीदारांनी सोनिवली येथे गुरुवारी रात्री मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हेमंत चतुरे यांना बेदम मारहाण केल्यानंतर त्यांना बदलापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
हेमंत चतुरे आपला भाऊ आणि एका मित्रासह सोनिवली येथील एका सोसायटीत गणेश दर्शनासाठी गेले होते. त्याच दरम्यान बंटी म्हस्कर आणि त्यांच्या साथीदारही त्याच सोसायटीत पोहोचले. निवडणूक काळात याच प्रभागातून शिवसेनेकडून हेमंत चतुरे यांनी निवडणूक लढवली होती. तर बंटी म्हस्कर यांच्या पत्नी या प्रभागात उमेदवार होत्या.
भाजपने शिवसेनेचा पराभव या प्रभागात मोठ्या फरकाने केला होता. मात्र निवडणूक काळात असलेल्या शिवसेना भाजपच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बदलापुरात हेमंत चतुरे यांना शिवसेनेकडून स्वीकृत सदस्य पद दिल्यानंतर त्यांनी पुन्हा त्याच भागात काम सुरू केल्यानंतरचा राग आल्याने ही मारहाण झाल्याचा आरोप हेमंत चतुरे यांचे निकटवर्तीयांनी केला आहे.
या मारहाण प्रकरणी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी योगेश म्हस्कर, तेजस म्हसकर आणि सागर म्हस्कर या तीन आरोपींना अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त काळे यांनी दिली आहे.
शहरात शिवसेना भाजपमधील तणाव वाढला
बदलापूर नगरपालिकेच्या शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या अनेक प्रकरणांवरून खटके उडत असून वालीवली येथे झालेल्या मारहाणीनंतर शहरात शिवसेना भाजपमधील तणाव आणखी वाढला आहे. त्यामुळे आता यापुढील काळात बदलापुरात राजकीय वैमनस्येतून गुन्हेगारी कृत्य घडू नये यासाठी पोलिसांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे.