

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेनेकडून ‘आरोग्य आपल्या दारी’, गडकोट स्वच्छता मोहीम, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ यासह अनेक लोकोपयोगी उपक्रमांची घोषणा शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील प्रांगणातील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर रिगल सिनेमागृहासमोरील त्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबई महापालिकेच्या वतीने ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून घरोघरी आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली जाईल.
भाजप अध्यक्षांचे मराठीतून अभिवादन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी सोशल मीडियावर मराठीत पोस्ट करत अभिवादन केले. त्यांनी लिहिले, ‘वंदनीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. माननीय बाळासाहेब हे एक द्रष्टे नेते होते. त्यांचे निर्भीड नेतृत्व, जनतेप्रती निष्ठा आणि प्रखर राष्ट्रवादी विचार यांचा महाराष्ट्रावर गाढा प्रभाव आहे. त्यांचे विचार हे येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देतील.’
उपमुख्यमंत्र्यांनी केल्या या घोषणा
बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी 100 कोटी
मराठी भाषा संवर्धनासाठी 100 कोटी रुपये मंजूर
रस्ता सुरक्षा मोहिमेसाठी 100 कोटी रुपये खर्च
10 हजार विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण
40 लाख मुंबईकरांना हक्काचे घर देण्याचा संकल्प
राज्यातील 29 महापालिका व 394 नगर परिषदांमध्ये ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ राबवले जाणार
पंतप्रधान मोदींकडून आदरांजली, मराठीतून खास पोस्ट
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर करत बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे दोन छायाचित्रे शेअर करत त्यांचे व्यक्तिमत्त्व व कार्याविषयी गौरवोद्गार काढले. मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानावर प्रकाश टाकला आहे.