

कल्याण : बदलापूर शहरातील एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंगाच्या प्रयत्नातील नराधम आरोपी इमरान पटेल याला बदलापूर पोलिसांनी अटक करीत कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी या प्रकरणाची सुनावणी घेत आरोपीला मंगळावर 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बदलापूर पश्चिमेतील नामांकित शाळेत शिकणारी 4 वर्षाची चिमुकली शाळा सुटल्यावर घरी उशिरा परतली असताना ती भयभीत आणि भेदरलेली असल्याने तिने काही सांगितले नाही असे तिच्या कुटुंबांचे म्हणणे आहे. कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. धक्कादायक म्हणजे शाळेचा व्हॅन चालक इमरान पटेल यांच्या विरोधात चार वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याचा आरोप झाला आहे.
पोलिसांनी त्याची स्कूल व्हॅन ताब्यात घेतली आहे. स्कूल व्हॅन चालविण्याचा परवाना त्याने आरटीओकडून घेतलेला नसल्याची माहिती समारे आली आहे. त्याला या प्रकरणात आआरटीओने 24 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आरोपीला पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी दुपारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयातील पोक्सा विशेष न्यायालयात हजर केले. पोक्सो विशेष न्यायालयाच्या जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्यासमोर बंद दारात या प्रकरणाची सुनावणी झाली.
न्यायाधीश पत्रावळे यांनी आरोपीला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलीस, वकिलांनी जास्त माहिती दिली नाही. त्यामुळे नक्की न्यायालयात काय युक्तीवाद झाला याची माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणाची बाल हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाकडून ही या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. या घनटेमुळे पुन्हा एकदा बदलापूर हादरले आहे.
बदलापूर प्रकरणाची बालहक्क आयोगाकडून दखल
बदलापुरात चार वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी शुक्रवारी बाल हक्क आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांनी पोलीस आणि शिक्षण विभाग सोबत बदलापुरात येऊन आढावा बैठक घेतली. ही घटना एका प्री स्कूलमध्ये घडली असून कोणतही प्री स्कूल शासनाच्या अखत्यारीत येत नसल्याचे बाल हक्क आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांनी सांगितले. या घटनेबाबत आम्ही शासनास अहवाल देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बदलापूर शहरात दहा अनधिकृत शाळा असून त्यातील तीन शाळा आम्ही बंद केल्या असल्याचे गटशिक्षण अधिकारी यांनी सांगितले. मात्र कोणतीही प्री स्कूल हे शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली येत नसल्याने प्री स्कूल बाबत निर्णय घेण्याचा अधिकार आम्हास नसल्यासही ते म्हणाले. त्यामुळे आता या प्री स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा बाबत शासन काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बदलापूर शहरात अनेक विद्यार्थी हे प्री स्कूलमध्ये शिकत असून या प्री स्कूल शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत आणाव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या संगीता चेंदवणकर यांनी सांगितले.
बदलापूर शहरात झालेली घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करण्याचे आदेश पोलीस आणि शिक्षण विभागाला दिले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी जे जे दोषी असतील त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
लक्ष्मण राऊत, सचिव, बालहक्क आयोग