

Mother Thrashes Daughter Arrested in Diva
ठाणे : सख्ख्या आईकडूनच आपल्या स्वतःच्या चार वर्षांच्या मुलीला उलथवणीने बेदम मारहाण केल्याचा हृदयद्रावक प्रकार दिवा परिसरात घडला आहे. विशेष म्हणजे अमानुष मारहाण करणार्या या महिलेचा क्रूर चेहरा तिच्या दुसर्या पतीच्या नऊ वर्षाच्या मुलीने समोर आणला आहे.
या नऊ वर्षाच्या मुलीने मारहाण केल्याचा व्हिडीओ पीडित मुलीच्या आजीला पाठवल्यानंतर आजीने यासंदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर सदर पीडित मुलीची पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. तर मारहाण करणार्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिवा परिसरातील साबेगाव परिसरात यशोदा ब्राह्मया गोडीमेटाला या 28 वर्षीय महिला आपल्या दुसर्या पतीसोबत राहतात. त्यांना आपल्या पहिल्या पतीपासून चार वर्षाची मुलगी असून ही मुलगी त्यांच्यासोबतच राहते. तर दुसर्या पतीलाही त्यांच्या पहिल्या पत्नीपासून चार मुले असून ही मुले सुद्धा याच घरात राहतात.
दरम्यान आपल्या चार वर्षांच्या मुलीला यशोदा ब्राह्मया या उलथवणीने अमानुष पद्धतीने बेदम मारहाण करत होत्या.मारहाण करताना त्यांच्या दुसर्या पतीची नऊ वर्षाची मुलगी आणि मुलानेही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असल्याचे या मुलीच्या व्हिडीओ मधून दिसत आहे.
या मुलीने काढलेला व्हिडीओ या चार वर्षांच्या मुलीच्या आजीला पाठवल्यानंतर या महिलेचा क्रूर चेहरा सर्वांसमोर आला. आजीने हा व्हिडीओ बघितल्यानंतर त्यांनी थेट मुंब्रा पोलीस स्टेशन गाठले आणि महिलेच्या विरोधात तक्रार नोंदवली.
मुंब्रा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन शेजारी चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. पोलिसांनी या महिलेच्या तावडीतून पीडित मुलीची सुटका करून या महिलेच्या विरोधात भारतीय न्याय संहिता सेक्शन 115(2), 118(1), 75 बालसरंक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंब्रा पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक अनिल सोनावणे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
दिवा चौकीत एका दक्ष नागरिकांनी एक महिला आपल्या मुलीला मारहाण करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर मुंब्रा पोलिसांचे पथक घटनास्थळी घेल्यानंतर आजूबाजूला चौकशी केली असता हा प्रकार सत्य असल्याचे उघड झाले. सदर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीची सुटका करण्यात आली आहे. मारहाण का करण्यात आली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून चौकशी सुरू आहे.
अनिल सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक, मुंब्रा पोलीस स्टेशन