

वागळे (ठाणे) : सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषांवरून निर्माण झालेला सामाजिक आणि राजकीय वाद लक्षात टॅक्सी व रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकणे गरजेचे झाले आहे. अनेक ऑटो रिक्षाचालक रोज शेकडो प्रवाशांचे संपर्कात असतात. ते मराठीचा सन्मान करतात पण त्यांना भाषा अवगत नसल्यामुळे अडचणी येतात.
मराठी ही महाराष्ट्राचा आत्मा आहे. येथे येणार्या प्रत्येकाने तिचा सन्मान केला पाहिजे. भाषा ही संवादाचं साधन आहे, वादाचं नव्हे. महाराष्ट्राच्या मातृभाषेला आदर देणे हे आपले कर्तव्य आहे. असे शिव परिवारचे संस्थापक अॅड. विनय कुमार सिंह यांनी रिक्शा-टॅक्सी चालकांना मार्गदर्शन करताना सांगितले.
ठाणे, मुंबई शहरात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांतून आलेले रिक्षाचालक उदरनिर्वासाठी ऑटो रिक्षा चालवत आहेत. त्यांना येणार्या मराठी भाषे संदर्भातील समस्या समजावून घेऊन शिव परिवारचे संस्थापक अॅड. विनय कुमार सिंह यांचे मार्गदर्शनाखाली शिव परिवार रिक्शा-टॅक्सी चालक कल्याण समिती, ठाणेच्या एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचे माध्यमातून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांतून आलेले ऑटो रिक्षाचालकांना शिवशांती प्रतिष्ठान कार्यालय, कामगार रुग्णालयाजवळ, ठाणे येथे प्रत्येक रविवार, दुपारी 12 वाजता मराठी भाषा शिकवणी वर्ग सुरू करून मराठी भाषा शिकवली जाणार आहे. या वर्गामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांतून आलेले ऑटो रिक्षाचालकांना आता मराठी भाषा शिकणार आहेत.
दि.6 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत 50 पेक्षा अधिक रिक्षाचालकांनी हजेरी लावली. व सकारात्मक प्रतिसाद देत या उपक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर रिक्षाचालकांनाही यामध्ये सहभागी करून घेणार आहे. हा उपक्रम केवळ भाषा शिकवण्यासाठी नसून समाजात समरसता आणि सुसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. शिव परिवारचा हा पायंडा इतर क्षेत्रातही अनुकरणीय ठरेल असा विश्वास विनय सिंह यांनी व्यक्त करण्यात येत आहे.