ठाणे : ठाकरे-शिंदे गटात संघर्ष वाढला; मनोरमा नगरच्या शाखेवरून दोन्ही गट आमने-सामने

ठाणे : ठाकरे-शिंदे गटात संघर्ष वाढला; मनोरमा नगरच्या शाखेवरून दोन्ही गट आमने-सामने

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधात उद्धव ठाकरे गटाचा संघर्ष वाढला आहे. मंगळवारी मनोरमा नगर येथील शाखेवर बॅनर लावण्यावरून दोन्ही गटातील लोक आमने-सामने आले. मनोरमा नगर येथील शिवसेनेच्या शाखेत शिंदे गटाचे पदाधिकारी बसले असताना ठाकरे गटातील काही महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी शाखेत घुसण्याचा प्रयत्न केला.

शाखेवर लावण्यात आलेला शिंदे गटाचा बॅनर उतरवून ठाकरे गटाचा बॅनर लावण्याचा प्रयन्त केला गेला. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे खा. राजन विचारे तसेच शिंदे गटाचे प्रवक्ते आणि माजी महापौर नरेश म्हस्के हे देखील या ठिकाणी उपस्थित होते . संघर्ष वाढू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी दाखल झाल्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी समजूत काढून अखेर शाखेला कुलूप लावले.

ठाणे हा सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला असून नेमकी शिवसेना कोणाची असा वाद रंगला आहे. त्यामुळे आता शिवसेना शाखांवर दोन्ही गटाकडून वर्चस्वाची लढाई सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने खा. राजन विचारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. तर दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या कारवायांच्या मागे शिंदे गटाचा हात असल्याचा आरोपही खा. राजन विचारे यांच्याकडून करण्यात येत आहे.

शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांना जनतेकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाहीं. शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांवर जाणूनबुजून कारवाई केली जात आहे. महापालिकेला केवळ हेच काम आहे का? रस्त्यावर खड्डे पडले आहेत ते का बुजवले जात नाही. दबाव आणून अशाप्रकारे कारवाई केली जात आहे.
– राजन विचारे, खासदार, ठाणे

या शाखेचा नारळ आनंद दिघे यांनी फोडला आहे. या शाखेचे काम नगरसेवक करत असून त्यांनी कष्टाने ही शाखा बांधली असून याचे उदघाटन मुख्यमंत्र्यांनी केले होते. या शाखेवर नगरसेवकांचा अधिकार आहे. ही शाखा बळकावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या कष्टाने जागा घेऊन शाखा बांधा. मुख्यमंत्री यांनी केलेल्या कामावर आयत्यावर कोयता मारण्याचा प्रयत्न करू नये.जे लोक इतर पक्षाचे काम करत होते त्यांनी शाखांवर आपला अधिकार सांगू नये
– नरेश म्हस्के, प्रवक्ते, शिंदे गट 

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news