Thane Crime | सोन्याच्या चेनसाठी दहावीतील विद्यार्थ्यांकडून मित्राची हत्या: दोन अल्पवयीन ताब्यात; १३ दिवसांनी खुनाचा उलगडा

एकाला बाईक खरेदीसाठी, तर दुसऱ्याला वाढदिवस साजरा करण्यासाठी हवे होते पैसे
Crime News
Crime NewsPudhari
Published on: 
Updated on: 

Thane School Student Death

ठाणे : नवीन बाईक खरेदी करण्यासाठी आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे हवे असल्याने दहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमित्राची सोन्याची चेन लुटण्यासाठी त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. सुरुवातीला बेपत्ता झाल्याची नोंद असलेल्या या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास करत १३ दिवसांनंतर छडा लावला. याप्रकरणी दोन सतरा वर्षीय अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सीसीटीव्ही तपासातूनही मिळेना धागा

२५ सप्टेंबर रोजी आझादनगर येथे राहणारे चंद्रकांत कांबळे यांनी त्यांचा दहावीत शिकणारा १७ वर्षीय मुलगा घरी परतला नसल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता मुलाचा शोध सुरू केला.

Crime News
Thane Crime : कल्याण-डोंबिवलीत ४० दिवसांत अपहरणाचे ६४ एफआयआर दाखल

तपासादरम्यान, बेपत्ता मुलाच्या एका वर्गमित्राने पोलिसांना सांगितले की, २४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८.१५ वाजता त्याचा मित्र ब्रह्मांड सर्कल येथून एका अनोळखी मुलासोबत पांढऱ्या रंगाच्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून घोडबंदर रोडच्या दिशेने गेला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरातील ८० ते ९० ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, बेपत्ता मुलाचा शोध लागला नाही.

माहिती देणाऱ्या विद्यार्थ्याच्या जबाबातील बाबी आणि सीसीटीव्ही फुटेज यांच्यात तफावत आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. संबंधित विद्यार्थ्याची पुन्हा चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने मित्र बेपत्ता झाल्याबद्दल दुःख व्यक्त करत आधी दिलेली माहिती खरी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तपासात ठोस माहिती मिळत नसल्याने पोलिसांनी बेपत्ता मुलासह संशयित विद्यार्थ्याच्या मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले.

Crime News
Thane Crime News: ठाणे तेच... पण बदलतात गुन्हेगारीचे मोहरे

या विश्लेषणातून काही संशयास्पद बाबी समोर आल्यानंतर पोलिसांनी १५ ऑक्टोबर रोजी संबंधित विद्यार्थ्याची पुन्हा चौकशी केली. या वेळी त्याने आणखी एका मित्राच्या मदतीने वर्गमित्राची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ब्रह्मांड फेज-२ परिसरातील निर्जन ठिकाणी झाडाझुडपांत अर्धवट जळालेल्या अवस्थेत असलेला बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह शोधून काढला.

चेन लुटण्यासाठी आखला हत्येचा कट

पोलिसांच्या तपासानुसार, या प्रकरणातील दोन्ही अल्पवयीन आरोपींना पैशांची गरज होती. त्यापैकी एकाला नवीन बाईक खरेदी करायची होती, तर दुसऱ्याला वाढदिवस साजरा करायचा होता. मात्र, पैसे उपलब्ध होत नसल्याने त्यांनी आपल्या वर्गमित्राच्या गळ्यातील सोन्याची चेन मिळवण्यासाठी त्याची हत्या करण्याचा कट रचला.

ठरलेल्या योजनेनुसार, २४ सप्टेंबर रोजी रात्री सिगारेट पिण्याच्या बहाण्याने त्यांनी मित्राला ब्रह्मांड फेज-२ येथील निर्जन ठिकाणी नेले. तेथे चाकूने वार करून आणि दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघे पुन्हा घटनास्थळी गेले आणि पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.

Crime News
Thane Crime News: ठाण्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; वेब सीरिजमधील तरुणीची सुटका,एजंट महिलेला अटक

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी मृत विद्यार्थ्याचा मोबाईल तोडून एका बसच्या छतावर फेकून दिला होता. त्यामुळे मोबाईलचे लोकेशन वेगवेगळ्या ठिकाणी दिसावे, असा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, तांत्रिक तपास आणि संशयितांची चौकशी यांच्या आधारे पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला.

सुरुवातीला बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीवरून सुरू झालेल्या तपासातून सोन्याच्या चेनसाठी मित्राची हत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणी दोन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news