

ऐतिहासिक ठाण्याची ओळख काळानुसार बदलत चालली आहे. ठाण्याचा इतिहासात ठाण्याची राजकीय परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, ठाण्याचा बदलता विकास आणि बदलती सत्ता, बदलते गुन्हेगारीचे चेहरे, भ्रष्टाचार अशा विविध अंगाने ठाण्याचा विकास झपाट्याने होतो आहे.
सर्वच परिस्थितीत सुरु झालेल्या वर्चस्वाच्या लढाई आता गुन्हेगारीचे राजकारण आणि राजकारणात गुन्हेगारी असं बदलत समीकरण पाहायला मिळत आहे. आज ठाण्याचा झपाट्याने आणि ऐतिहासिक बदल आणि विकास होताना दिसत असला तरी पडद्यामागे मात्र खळबळ आणि जीवघेणी स्पर्धा सुरू झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
यामुळे सुजलाम सुफलाम ठाण्यात मात्र राजकारणात गुन्हेगार की गुन्हेगारीत राजकारण हा फरक आणि संभ्रम निर्माण झालेला आहे. तसे राजकारणात गुन्हेगारी ही परंपरा ठाण्यातच नाही तर जवळपास देशात सुस्पष्टपणे पाहायला मिळत आहे. हीच परंपरा आणि संस्कृती ठाण्यात पाहायला मिळाली आणि मनाला प्रश्न पडतो की राजकारणात गुन्हेगारी की गुन्हेगारीत राजकारण नेमकं काय आहे हे समजणे कठीण आहे.
ठाण्यात राजकीय हत्येची पहिलीच वेळ नाही. स्व. दिघे यांच्या कारकिर्दीतील खोपकर हत्या प्रकरण त्यानंतर अनेक प्रकरणे घडली. काहींना राजकीय झालर लागली तर काही हत्या ना गँगवारची झालर लावण्यात आली.
काही हत्यांना वैमनस्याची झालर लावण्यात आली तर काही हत्यांना जमीन, संपत्तीचा वाद याची झालर लावण्यात आली मात्र ठाण्यात बऱ्याच हत्या झाल्या, घडविल्या गेलेल्या आहेत यात शंका नाही हा इतिहासच आहे.
ठाण्यात विविध पक्षात गल्लीबोळातल्या छोट्या-मोठ्या त्याचबरोबर सोशल मीडियावरील युट्युब भाई तसेच बॅनरबाजीमधले भाई आणि राजकारणातली भाई यांची भाऊ गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळते लोकशाहीचे स्वातंत्र्य मिळाल्याने आणि गब्बरगंड झाल्याने अहंकाराने आता हुकूमशाही चालवण्याची प्रवृत्ती बाळवलेली आहे.
म्हणूनच ठाण्यात गुन्हेगारी आणि भाईगिरी वाढत चालली आहे. ठाण्यातच नव्हे तर दोन दशकापासून राजकारण आणि गुन्हेगारी हे अतूट नाते झालेले आहे. या सर्वांना कायद्याच्या कचाट्यातून वाचविण्यासाठी सरसावणारे राजकीय नेते पक्षाची पदाधिकारी हेच मुळात जबाबदार आहे.
पोलीस मात्र नाईलाजाने आपलं कर्तव्य कायद्याच्या चौकटीत पार पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याने ठाण्यात आज गुन्हेगारांवर राजकीय नेत्यांचा वरदहस्त पाहायला मिळतो आहे. गुन्हेगारांवर पोलीस आणि कायद्याचा अंकुश नाही हे सध्याच्या परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे.
अवघ्या राज्यात चर्चेत असलेल्या पूर्णेकर हत्या प्रकरण पाहता नेमके चालले तरी काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. 24 तासात भल्या भल्या भाईंना गजाआड करण्याची मर्दूमकी गाजविणाऱ्या ठाणे पोलिसांमध्येही बदल होत गेलेले आहे. शेवटी प्रवाहाच्या विरोधात वाटचाल न करणारे पोलिसही माणूसच आहेत.
पूर्णेकरांची हत्या झाली 15 दिवसात पोलिसांनी काय मिळवले. तर हत्येच्या वेळी दुचाकीवर आलेला पप्या शिंदेची दुचाकी, पप्या शिंदेचा मोबाईल, कर्नाळा येथून अटक केलेले आरोपी निखिल यादव, नितेश पवार त्यांच्या अटकेनंतर चौकशीत जंगलात फेकलेले पिस्टल, आणि मोबाईल हस्तगत केले.
पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास हा ‘एक अधुरी कहाणी’ प्रमाणेच दिसला. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात झालेला गदारोळ, आरोप प्रत्यारोप, राजकीय वादळ, अफ़वाचे आलेले पीक आदिमुळे पोलिसांनी 9 विशेष पथके तयार करून विविध कारणांच्या दिशेने तपास सुरु केला.
आरोपी लपलेल्या संभावित ठिकाणी, हत्येशी संभावित ठिकाणी आरोपीचा शोध, संबंधिताचे जाबजबाब नोंदविणे, निष्पन्न आरोपीच्या मित्रमंडळी, नातेवाईकांची चौकशी करणे, आरोपीनी पळून जाण्यासाठी वापरलेली वाहनाची तपासणी, आरोपीच्या मित्रमंडळींचे मोबाईल ट्रेस करणे अशा विविध कामे करीत असतानाच राज्यभर दोन पथके आणि राज्याच्या बाहेर दोन पथके आरोपीचा शोध घेत होते.
याच दरम्यान पोलिसांनी निखिल यादव आणि नितेश पवार यांना अटक केली. मात्र फरारी आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि हत्येतील ओळख न पटलेला हेल्मेटधारी आरोपी हें भूमिगत झाल्याने ठाणे पोलिसांना आपल्या कौशल्य आणि चाणक्ष बुद्धीचा वापर करीत आरोपीचा शोध सुरु ठेवला.
तर पोलीस कोठाडीतील तीन आरोपीही हेल्मेटधारी आरोपीची ओळख पटवू शकले नाही. पोलिसांनी न्यायालयात अटक आरोपीच्या पोलीस कोठाडीसाठी दोन वेळा अटक आरोपी तपासात सहकार्य करीत नसल्याची सबब न्यायालयात मांडली.
यातही राजकारण दडल्याचे चित्र आहे. एसआयटी पथकाने दहा दिवसात राज्याच्या बाहेर भारत-नेपाळ सीमेलगत आरोपींचा शोध घेत होते. तर पोलीस पथकाने मात्र या कालावधीत पप्या शिंदेची बाईक पूर्णेकर यांच्या कार्यालयाजवळ असलेली ताब्यात घेतली.
एक पिस्टल, एक मोबाईल, पळून जाण्यासाठी अल्टो कार नवीमुंबईतून हस्तगत केली. तर आरोपीना अटक करा या मागणीसाठी सर्व पक्षीय मोर्चाही निघाला आणि पोलिसांची तारेवरची कसरत संपली. पण खऱ्या अर्थाने आता अग्निपरीक्षा सुरू झाल्याचे चित्र आहे.
ठाणे तेच आहे विकासाच्या वाटेवरील एक शहर आजही आहे. पण ठाणे शहरातील राजकारण आणि गुन्हेगारीकरण झपाट्याने बदलत गेले आहे. राजकारणातील बदलाला स्थिरता आलेली असली तरीही वर्चस्वचा समतोल राखण्यासाठी लागणाऱ्या मॅन पॉवरच्या मोहरक्या मध्ये बदल घडत चालले आहेत. त्यामुळेच ठाण्यात धक्कादायक प्रकार घडताहेत. ठाण्याच्या राजकारण गुन्हेगारीचा इतिहास मोठा आहे.
सन 1980 ते 1990-95 च्या काळात पिंट्यादादा, नवनाथ गँग, गौरी दादा, गणेश सावंत यांचा बोलबाला होता. मुळात हे पोलीस दप्तरी गुन्हे दाखल असल्याने गुन्हेगार जरी असले तरीही ते लोकप्रतिनिधीही होते. पण हीच मंडळी राजकारण चालवीत होती. त्यांची दहशत जरी असली तरीही त्यांची लोकप्रियत्ता मसीहा सारखी असल्याचे चित्र होते.
त्यानंतर 2002 ते 2005 आणि नंतर काहीकाळ ठाण्यात तांडेल ग्रुपची चलती होती. या दरम्यान ठाणे जिल्ह्यातील राजकीय हालचाली आणि खान्देपाटची रेलचेल सुरु होती. ठाण्याचा झपाट्याने विकास सुरु झाला ठाणे मेगासिटी शहराकडे वाटचाल करीत असताना ठाण्यात अवैध आणि अनधिकृत धंद्याचे पेव फुटले आणि राजकारणातील गुन्हेगारांनी उचल खाल्ली लोकप्रतिनिधी असतानाच अनेकजण गुन्हेगारीच्या दलदलीत अडकले ठाण्याच्या विटावा परिसरात याच दरम्यान दीपक पाटील नावाच्या तात्कालीन समाजसेवक आणि भाई याची हत्या सिनेमातल्या दृश्याप्रमाणे चारचाकी वाहनाचा पाठलाग करून भर रस्त्यात अडवून बेछूट गोळीबार करून केलेल्या हत्याने पुन्हा एकदा ठाणे थरारले.
या हत्येनंतर गुन्हेगारी जगतात पुन्हा नव्याने अनेक लोकांचा उदय झाला. त्यांना आपल्या दिमतीला घेण्यासाठी अनेक मान्यवर नेत्यांनी त्यांना संरक्षण आणि कवच देण्याचा प्रयत्नही केला. दरम्यान न्यायालयाने या प्रकरणात आरोपींना शिक्षा ठोठावल्याने ठाण्यात त्यांची एक वेगळी छाप निर्माण झाली. त्याचाच परिणाम काही लोक हे कारागृहात असतानाही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले हे विशेष आहे.
त्यानंतर कायदे कडक होत गेले. पोलिसांची अंमलबजावणी काटेकोरपणे होऊ लागले त्यामुळे काही प्रमाणात गुन्हेगारीला आळा बसला होता मात्र तरीही राजनीती आणि गुन्हेगारी यांचा अतूट नातं हे आजही अभेद्य असून छोट्या-मोठ्या गुन्हेगारी कारवाया ह्या राजकीय आशीर्वाद आहेत सुरूच असल्याचे स्पष्ट चित्र सर्वश्रुत आहे.
पूर्णेकर यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा ठाणे थरारले
पुर्णेकर यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा ठाणे थरारले अनेक काळ गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व असलेल्या स्पर्धेत आता नव्याने गुन्हेगारी कारकिर्दीची स्पर्धेतील मंडळी ही समोर आली आहे मात्र यावेळेस गुन्हेगारांच्या टोळ्या आणि त्याचे प्रमुख यांच्यात सातत्याने बदल होत राहिले प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर देखील हाच बदलाव आता यापुढे पाहायला मिळणार आहे.
प्रदीप पुर्णेकर यांची हत्या नेमकी कुठल्या कारणाने झाली. याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही मात्र ठाणे पोलिसांनी घटनेच्या दिवशीच घटनास्थळावर असलेल्या पप्या शिंदे, नितेश पवार, निखिल यादव, संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि हत्ये दरम्यान तब्बल पंधरा दिवस हेल्मेटधारी शुटर कोण? हे रहस्य कायम ठेवणारा आरोपी अमित जयकिशन सिंग उर्फ पपलू यांना नैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन प्रयागराज येथून अटक केली. सर्व आरोपींना अटक केल्यानंतर आता ठाणे पोलिसांची खरी अग्निपरीक्षा सुरू झालेली आहे.
ठाणे पोलिसांना अनेक रहस्यमय प्रश्नांची उत्तरे मिळवायची आहेत तर या
हत्येत कुठल्या आरोपीचा काय रोल आहे हे देखील एक रहस्यच आहे. ठाणे पोलीस पूर्णेकरांच्या हत्येमागचं कारण, आरोपींनी संगनमताने हत्या का केली? आरोपींनी केलेल्या हत्येत कुणी पिस्टलचा वापर केला. हत्येत किती पिस्टलचा वापर झाला.
कुणी गोळीबार केला किती राउंड फायर केले? पिस्टल कोठून आणले? हत्येत अप्रत्यक्षपणे सहकार्य करणारे लोक? पिस्टल खरेदीसाठी कुणी? पैसे पुरविले. हत्येचा नियोजित आराखडा प्लॅनिंग कुणी केले? हत्येत अटक आरोपी पैकी सूत्रधार कोण? हत्येत वापरात आणलेला कोयता आणि कोयत्याने पूर्णेकरांवर वार करणारा आरोपी कोण? हत्येमागे आर्थिक व्यवहार, कोट्यावधीचा विकास? कि दुश्मनी? अशी विविध कारणाचा तपाससोबतच हत्येचा मास्टरमाईंड कोण? आर्थिक रसद पुरवीणारा कोण? कि हत्येत कॉन्ट्रक्ट किलिंग पद्धतीचा वपार झाला का? कॉन्ट्रक्ट किलिंगचा ठेका देणारा कोण? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांना कौशल्यपूर्ण तपासायची आहेत.