

बोईसर : इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता औद्योगिक क्षेत्रालाही बसू लागला आहे. पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर एमएसएमई स्वरूपातील केमिकल उद्योग कार्यरत असून त्यासोबत स्टील उद्योग, टेक्स्टाईल विव्हिंग तसेच प्रोसेस हाऊसही मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ आणि इंधन पुरवठ्यातील निर्बंध यामुळे उद्योग अडचणीत सापडले आहेत.
युद्धामुळे इराणकडून होणाऱ्या क्रूड ऑइल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्याचा थेट परिणाम केमिकल उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सॉल्व्हेंट्सवर झाला असून गेल्या दहा दिवसांत सॉल्व्हेंट्सच्या किमती जवळपास 50 टक्क्यांनी वाढल्याची माहिती उद्योग क्षेत्रातून मिळत आहे. परिणामी सर्व प्रकारच्या केमिकल उत्पादनांच्या किमतींवर परिणाम झाला असून अनेक उद्योगांमध्ये उत्पादन घटल्याचे चित्र आहे.
याशिवाय बॉयलरसाठी लागणाऱ्या इंधनाच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. विशेषतः नॅचरल गॅसच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले असून गुजरात गॅस लिमिटेडने उद्योगांना गॅस वापर 50 टक्क्यांनी कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिक वापर झाल्यास दंड आकारण्याबाबतही नोटिसा देण्यात आल्याने उद्योगांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. नॅचरल गॅसवर चालणारे बॉयलर गॅसअभावी बंद पडल्यास अनेक कारखाने थेट बंद पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, निर्यात होणाऱ्या मालाच्या वाहतूक खर्चातही मोठी वाढ झाली आहे. समुद्रमार्गे तसेच हवाई मार्गे माल वाहतुकीचा खर्च वाढल्याने डिलिव्हरी कालावधी अनिश्चित झाला आहे. मुंबईहून होणारी हवाई मालवाहतूकही ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याचे उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले. आयात होणाऱ्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेतही घट झाल्याने उत्पादन प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत.
कच्च्या मालाच्या किमतींवर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे विशेषतः एमएसएमई उद्योजक हवालदिल झाले आहेत. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास अनेक कारखाने बंद पडण्याची शक्यता उद्योग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर कामगार कपातीची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर कामगार वर्गातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी कोरोना महामारीच्या काळात अनेक कामगारांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. आता पुन्हा युद्धजन्य परिस्थितीमुळे कारखाने बंद पडतील का, अशी चर्चा कामगारांमध्ये सुरू झाली आहे. काही कामगार आपल्या मूळ गावी परत जाण्याबाबतही विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घटत असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेवरील कर्जाचे ओझे वाढण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. एकूणच युद्धजन्य परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास उद्योग, कामगार आणि अर्थव्यवस्थेसमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम देशातील औद्योगिक क्षेत्रावर उमटू लागला असून बोईसरजवळील तारापूर एमआयडीसीतील विशेषतः सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) केमिकल उद्योगांवर त्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. कच्च्या मालाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ, नॅचरल गॅस पुरवठ्यातील निर्बंध आणि वाहतूक खर्चातील वाढ यामुळे उद्योग क्षेत्रात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. निर्माण झाले आहे.