

ठाणे : प्रवीण सोनावणे
राज्यात एकीकडे मोठ्या प्रमाणात शाळा बंद पडत असताना दुसरीकडे शिक्षकी पेशाकडे जाण्याचा तरुणांचा व विशेषत: महिला वर्गाचा कल कायम असल्याचे समोर आले आहे. 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता राज्यात बी.एड. प्रवेश प्रक्रियेसाठी 1 लाखांपेक्षा अधिक जणांनी नोंदणी केली आहे.
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते राज्यात अनेक शाळा बंद पडत असल्या तरी दुसरी खासगी शाळांची विशेष करून इंग्रजी शाळांची संख्या वाढली आहे. दुसरीकडे एक सुरक्षित व मानसन्मानाची नोकरी असा या पेशाकडे बघण्याचा तरुणांचा, विशेष करून महिला वर्गाचा दृष्टिकोन अजूनही तसाच असल्याने शिक्षकी पेशाकडे वळण्याचा कल कायम असल्याचे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतल्या जाणाऱ्या बी.एड. प्रवेश परीक्षेसाठी यंदा 1,09,485 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात 7040 ने घट झाली तरी हे प्रमाण जास्त नसल्याने शिक्षक होण्याकडे तरुणांचा कल कायम असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षासाठी बी. एड. सह एमएड व एमपीएड अशा तिन्ही अभ्यासक्रमांसाठी एकूण 1 लाख 16 हजार 122 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. राज्य सरकारने 2026-27 च्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी 89,240 कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी राज्यातील शाळांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.
सरकारी शाळांत केवळ 23.68 टक्के विद्यार्थी आहेत. तर अनुदानित शाळांमध्ये हेच प्रमाण 45.47 टक्के आहे. राज्यात 8,192 शाळा अशा आहेत ज्यांमध्ये एकच शिक्षक आहे. राज्यात शिक्षण क्षेत्राची अशी परिस्थिती असतानाही शिक्षक होण्याकडे तरुणांचा कल मात्र कमी झालेला नाही.
मान सन्मान व महिला वर्गासाठी सुरक्षित नोकरी म्हणून पाहण्याचा दृष्टकोन
डी एड कडून बीएड करण्यासाठीही प्रवेश परीक्षा दिली जाते. त्यामुळे आकडा वाढलेला दिसतो
अनेक शाळा बंद पडत असल्या तरी, स्वयं अर्थसहायातून सुरू होणाऱ्या शाळांचे राज्यात प्रमाण वाढले आहे.
राज्यात इंग्रजी शाळांची संख्या वाढल्यामुळे नोकरीच्या संधी वाढल्या आहेत.
शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन कामांचा समावेश केल्याने तरुण वर्गाचे शिक्षक होण्याकडे कल वाढला.
एमपीएड : 24 मार्च , (फिल्ड टेस्ट : 25 मार्च)
एम.एड. : 25 मार्च, बी.एड. : 27 ते 29 मार्च
विद्यार्थ्यांनी नोंदणी किती?
वर्ष | बी.एड.| एम.पी.एड | एमएड
2023-24 | 79,184 | 2088 | 3066
2024-25 | 79,083 | 2666 | 2985
2025-26 | 1,16,585 | 2284 | 3809
2026-27 | 1,09,485 | 2536 | 3952