

ठाणे: महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बारामतीसारख्या शांत तालुक्यातही गोळीबाराच्या घटना घडू लागल्या आहेत, ही चिंतेची बाब आहे. राज्याचे मुख्यमंत्रीच गृहमंत्री असल्याने त्यांनी या घटनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
पोलीस यंत्रणेने परिस्थितीत सुधारणा केली नाही, तर आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. ठाण्यात एका खासगी कार्यक्रमासाठी आल्या असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत असल्याबाबत बोलताना सुळे यांनी या घडामोडींमागे अनेक कारणे असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरघटीचे श्रेय घेतले आहे की, त्यामागे जागतिक आर्थिक परिस्थिती आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा प्रभाव आहे, हे सध्या स्पष्ट नाही.
सोन्या-चांदीचे दर अद्याप स्थिर झालेले नाहीत. पुढील दोन ते चार दिवसांत यामागील कारणांबाबत अधिक स्पष्टता येईल, असे त्या म्हणाल्या. जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलांचा सविस्तर अभ्यास करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसांची योग्य कामे झाली नाहीत, असे मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी एका कार्यक्रमात म्हटल्याबाबत विचारले असता, सुळे म्हणाल्या की, हे वक्तव्य खरे असेल तर ती अतिशय दुर्दैवी बाब आहे. इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामात झालेल्या विलंबाबाबतही सुळे यांनी नाराजी व्यक्त केली.
स्मारकाचे काम आधीच खूप उशिराने सुरू आहे. देशाचे सुपुत्र आणि आपल्या सर्वांसाठी वंदनीय असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अद्याप पूर्ण झालेले नाही, ही खेदाची बाब आहे. त्यामुळे कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होत असेल, तर त्याचे आपण स्वागत करतो, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान,आनंदराज आंबेडकर यांनी जालन्यात केलेल्या भाषणाबाबत आपल्याला माहिती नसून, ते भाषण ऐकल्यानंतरच प्रतिक्रिया देईन, असे सुळे यांनी स्पष्ट केले. धाराशिवमधील खरेदीदारांनी केलेल्या आरोपांबाबत प्रत्येकाला लोकशाहीत आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवंगत रामराव वडकुटे यांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती. त्यांचे आमच्याशी जुने कौटुंबिक संबंध होते, असे सांगत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आगामी विधानसभा अधिवेशनात राजकीय आणि सामाजिक प्रश्नांसह जनतेच्या प्रश्नांवर पारदर्शकपणे चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 'महाराष्ट्र एक्स्ट्रीम फाईल' चित्रपटाबाबत मात्र आपल्याला सध्या कोणतीही माहिती नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.
पीडित कुटुंबाला न्याय मिळावा
पूर्णेकर कुटुंबीयांनी नुकतीच आपली भेट घेतली असून, कुटुंबाला न्याय मिळावा, एवढीच त्यांची अपेक्षा असल्याचे सुळे यांनी सांगितले. आगामी विधानसभा अधिवेशनात हा विषय उपस्थित केला जाणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांना या प्रकरणावर सभागृहात पारदर्शकपणे चर्चा करण्याची विनंती केली आहे. या प्रकरणातील सत्य समोर आले पाहिजे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधेयक समोर आल्यावरच डिलिमिटेशनवर भूमिका
डिलिमिटेशन विधेयक आणि संजय राऊत यांनी केलेल्या १५० कोटी रुपयांच्या चर्चेबाबत विचारले असता, सुळे यांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला. डिलिमिटेशनसंदर्भातील विधेयक अद्याप आमच्यासमोर आलेले नाही. भाजपला ४० ते ५० खासदारांची कमतरता आहे का, किती खासदार कमी किंवा जास्त पडत आहेत, याबाबतही मला माहिती नाही.
विधेयक प्रत्यक्ष समोर आल्यानंतरच आमचा पक्ष त्यावर सविस्तर आणि स्पष्ट भूमिका मांडेल, असे त्यांनी सांगितले. तसेच, आमचा गट नसून आमचा पक्ष आहे, असे म्हणत त्यांनी पक्षाच्या अस्तित्वाबाबतही स्पष्ट भूमिका मांडली.