

शशिकांत सावंत, ठाणे
कोकणात आपले राजकीय वजन कायम राखण्याच्या स्पर्धेत सुनील तटकरे, नारायण राणे ही दोन नावे जि. प. निवडणुकीत आघाडीवर दिसली. योग्य वेळी योग्य राजकीय चाल खेळून त्यांनी आपला दबदबा कायम राखला आहे. तथापि, अजित पवारांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पोकळी आपल्या राजकीय चातुर्याने भरून काढण्याचे काम सुनील तटकरेंनी केल्याने त्यांचे पक्षातील स्थान अधिक मजबूत झाल्याचे दिसते.
दुसरीकडे नगरपालिकेत काहीसे पिछाडीवर असलेले नारायण राणे आपल्या राजकीय कौशल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत फ्रंट फूटवर आले. त्यांची दोन मुले वेगवेगळ्या पक्षात असल्याने राजकीय समतोल साधून आपले वर्चस्व राखण्याचे आव्हान त्यांनी लीलया पेलले. साहजिकच कोकणात नारायण राणे आणि सुनील तटकरे यांचे राजकीय वजन वाढताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून सुनील तटकरे यांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली; परंतु आता राष्ट्रवादीत निर्माण झालेली पोकळी व सत्तारूढ भाजपसोबत आपल्या पक्षाचे संबंध दृढ व्हावेत म्हणून सुनील तटकरेंनी घेतलेली भूमिका निर्णायक ठरली. दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद निवडणुकांची धुरा पुन्हा एकदा नारायण राणेंकडे आल्याने आणि भाजप शिवसेनेमधील युतीधर्म पाळण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे अढळ स्थान कायम राहिले.
अजित पवारांचे नेतृत्व त्यांच्या खुमासदार शैलीमुळे लोकांना आपलेसे करणारे होते. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार असा त्यांच्या पक्षाचा डोलारा होता. मात्र, ते गेल्यानंतर अवघ्या चार दिवसांत उपमुख्यमंत्रिपदी सुनेत्रा पवार यांची निवड करून पक्षाला स्थैर्य देण्याच्या ज्या घडामोडी घडल्या त्यात सुनील तटकरे आघाडीवर होते.
पाटील की पटेल?
राष्ट्रवादीची धुरा पाटील यांच्या हाती जावी, पण पटेल यांच्या हाती जाऊ नये, अशी भूमिका काहींनी घेतली. मात्र, या स्थितीतही स्थतिप्रज्ञ राहत, योग्य राजकीय चाली खेळण्यात तटकरेंना यश आले. म्हणूनच त्यांचे पक्षातील स्थान अधिक मजबूत झालेले पाहायला मिळते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा एका बाजूला सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे नेते राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व राहो म्हणून प्रयत्नशील आहेत.
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे शरद पवारांच्या हाती जातील, असे वाटल्याने सुनील तटकरे, छगन भुजबळ या नेत्यांनी झटपट निर्णय घेत अजित पवार गेल्यानंतर अवघ्या 4 दिवसांत सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घडवून आणला आणि हा विषय वादग्रस्तही ठरला. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरेंचे वर्तन अशोभनीय असल्याची टीका केली. तर या निर्णयात घाई झाली, असे सांगत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रामदास कदम यांच्या विधानाला काहीशी पुष्टी दिली.
निर्माण झालेले वाद, घेतलेले निर्णय, तापलेले राजकारण या सर्वच स्थितीमध्ये सुनील तटकरे यांचे राजकीय महत्त्वही अधोरेखित झाले आणि टीकेचे धनीही तेच झाले. खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय स्थैर्य लक्षात घेऊन भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला अधिक जवळ घेतले. महापौर निवडणुकीत त्यांना झुकते मापही दिले. त्यामुळे शिवसेनेचा आनंद गगनात मिळेनासा झाला होता. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे आणि छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल या नेत्यांनी उलटे फासे फिरवत सेनेच्या आनंदावर विरजण घातले म्हणूनच पुढील अस्वस्थताही पाहायला मिळाली.
भाजपबरोबर आपले स्नेहभाव दृढ व्हावे म्हणून वाऱ्याच्या वेगाने घडामोडी घडल्या आणि भाजपला शिवसेना नाही आम्हीच तुमचे विश्वासू सहकारी आहोत, असे दाखवून दिले गेले. या घडामोडीमुळे सुनील तटकरे यांची स्थिती एकाबाजूला मजबूत झाली, तर दुसऱ्या बाजूला दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण थांबले. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे नेते एकेकाळी शरद पवारांचे खंदे समर्थक होते. मात्र, पक्षाच्या आधी सत्ता हवी, या मुद्द्यावर त्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या रथाचे सारथ्य करत भाजपशी स्नेहमीलन घडवून आणले. कारणे काहीही असली तरी राष्ट्रवादीचे सारथ्य तटकरेंच्या खांद्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे.
कोकणच्या राजकारणावर वर्चस्वासाठी स्पर्धा
कोकणात जे राजकीय नेते यशाची किनार गाठू शकले त्यामध्ये बॅ. ए. आर. अंतुले आणि त्यापूर्वी पी. के. सावंत ऊर्फ बाळासाहेब सावंत यांची कारकीर्द खास होती. तसे पाहिले तर बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते, सुरेश प्रभू असा केंद्रीय स्तरावरील प्रभावी नेत्यांचा एक कालखंड होता. तसा राज्यात पी. के. सावंत, ए. आर. अंतुले यांचाही कालखंड होता. नंतरच्या काळात ही जागा नारायण राणे, सुनील तटकरे यांनी घेतल्याचे पहायला मिळाले. कोकणातील दोन नेत्यांचे महत्त्व आताच्या राजकारणात वाढले आहे. त्यातीलच नारायण राणे, सुनील तटकरे हे दोन नेते आहेत.