

उरण : उरण-बेलापूर महामार्गावर उलवे ब्रिजजवळ झालेल्या भीषण अपघातात आयशर टेम्पोमधील चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाजवळ निष्काळजीपणे उभ्या केलेल्या डंपरला टेम्पो मागून धडकल्याने ही दुर्घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे 4:45 वाजता घडली. मृत व्यक्तींची नावे उमेश सदानंद उतेकर (वय 45, चालक) आणि सुयोग राजेंद्र पवार (वय 25, क्लिनर) अशी आहेत. अपघात इतका भीषण होता की, टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला आणि चालक व क्लिनर आत अडकले होते. अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांना बाहेर काढून पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी पोलीस हवालदार रामचंद्र रघुनाथ घागरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डंपर चालक सुनिल मारूती कपलीकर (वय 37) आणि बाबु मारूती कपलीकर (वय 30) यांनी सुरक्षेची पुरेशी खबरदारी न घेता आपली वाहने रस्त्यावर पार्क केली होती.
त्यांच्या या हलगर्जीपणामुळे दोघांच्या मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. उलवा पोलिसांनी दोन्ही डंपर चालकांविरोधात भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 106(1) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.यापूर्वीही अशाच प्रकारे अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत.तरीही त्याबाबत ठोस उपाय शोधले जात नाहीत .