

ठाणे : ठाणे महापालिकेचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या प्रकरणात आणखी दोघांना ठाणे लाचलुचपत विभागाकडून अटक करण्यात आली आहे. मंदार गावडे आणि संदीप पावसकर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनीच संबंधित विकासकाशी पाटोळे यांची भेट घडवून आणली होती. झालेले बँकेचे व्यवहार आणि कॉल रेकॉर्डवरून या दोघांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.
नौपाड्यातील तीन गाळे तोडण्यासाठी ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह दोघांना मुंबई लाचलुचपत विभागाकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर हा सर्व तपास लाचलुचपत विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. सध्या निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे हे जामिनावर बाहेर आहेत. तर लाचलुचपत विभागाने तपासाला वेग आणला असून या प्रकरणात आणखी दोघांना अटक केली आहे.
या दोघांनाही अटक करताना ठाणे लाचलुचपत विभागाने कॉल रेकॉर्ड तपासले आहेत. त्याचप्रमाणे जो बँक व्यवहार झाला आहे त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी पुरावे शोधण्याचे काम ठाणे लाचलुचपत विभागाकडून सुरु आहे.