

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर होत असतानाच आता डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखानपाडा येथील गणेश घाट स्मशानभूमीतही भटक्या श्वानांचा वावर वाढल्याचे चित्र आहे. स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांना यामुळे त्रास सहन करावा लागत असून, प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी होत आहे.
अंत्यविधीसाठी नातेवाईकांकडून मृतदेहासोबत आणण्यात येणारी अन्नधान्याची शेवटची शिधा आणि अन्य वस्तूंच्या वासामुळे श्वान स्मशानभूमीत येत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. अंत्यविधी झाल्यानंतर परिसरात राहिलेल्या पदार्थांमुळे श्वान पुन्हा स्मशानभूमीत जमा होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, श्वान मृतदेह ओढून नेतात किंवा मृतदेह खातात, अशी माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
श्वानांचा वावर हा प्रामुख्याने अन्नधान्य, खाद्यपदार्थ अथवा अन्य वस्तूंच्या वासामुळे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या समस्येवर उपाय करताना श्वानांना पकडण्याबरोबरच स्मशानभूमीतील स्वच्छता आणि अन्नपदार्थांची योग्य विल्हेवाट लावणेही आवश्यक ठरणार आहे.
स्मशानभूमीच्या परिसरात तुटलेले प्रवेशद्वार, अपुरा प्रकाश आणि सुरक्षारक्षकांचा अभाव असल्याने श्वानांना आत प्रवेश करणे सहज शक्य होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.
याशिवाय स्मशानभूमीत मृतदेहाची नोंद करण्यासाठी कर्मचारी, अंत्यविधीसाठी लाकडांची व्यवस्था, पिण्याचे पाणी तसेच गॅस शवदाहिनी चालविण्यासाठी कर्मचारी अशा मूलभूत सुविधांचीही कमतरता असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईकांना मानसिक धक्क्या सोबतच अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, शिवमंदिर स्मशानभूमीचे नूतनीकरण सुरू असल्याने कुंभारखानपाडा स्मशानभूमीवरील ताणही वाढला आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध स्मशानभूमीत स्वच्छता, प्रकाशयोजना आणि सुरक्षा व्यवस्था सक्षम करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रश्नावर स्थानिक नगरसेवक विकास म्हात्रे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. स्मशानभूमीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यासोबतच परिसरातील भटक्या श्वानांचा वावर नियंत्रित करणे गरजेचे आहे.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
संतप्त डोंबिवलीकरांनी प्रशासनापुढे प्रश्न उपस्थित केला असून करदात्यांच्या पैशांतून उभारलेल्या स्मशानभूमीत जर मृतदेहाला देखील सन्मानाने निरोप देऊ शकत नसतील तर त्याचा उपयोग काय? स्मशानभूमी परिसरात तातडीने २४ तास सुरक्षा, संपूर्ण आवारात सीसीटीव्ही कॅमेरे, उंच कंपाऊंड आणि भटक्या श्वानांचे युद्धपातळीवर निर्बीजीकरण करावे अशी मागणी आता जोर धरत आहे. दरम्यान येथील विविध समस्या पाहता प्रशासनाने आता तरी तातडीने उपाययोजना कराव्यात. अन्यथा या निष्काळजीपणाची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.