

Stabbing over dispute over withholding of brother's salary; two injured
भिवंडी : पुढारी वृत्तसेवा
एका नातेवाईकाने त्याच्या भावाने दुसर्या नातेवाईकाच्या कपड्यांच्या दुकानात केलेल्या पगाराच्या पैशांची मागणी केली असता दुसर्या दुकान मालक नातेवाईकाने पैसे नंतर देतो असे सांगितल्याच्या रागातून दोन नातेवाईक गटात शिवीगाळ आणि तुफान राडा होऊन मारहाणीसह झालेल्या चाकूहल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री नागाव येथे घडली आहे.
याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गटातील एकूण 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद सदाम मो. दास सिद्धीकी (32), मोहम्मद नसीम मोहम्मद दास सिद्धीकी (23), मोहम्मद कामीन मोहम्मद दास सिद्धीकी (27), ताहीर ऊ र्फ अरमान मोहम्मद अहमद खान (21), मोहम्मद कैफ (19) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताहीर खान आणि मो. सदाम सिद्धीकी हे नागाव येथील प्लाझा हॉटेल समोर एकत्र राहत असून या दोघांचा जुने कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. ते दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत.
दरम्यान तय्यब हा सदामकडे कपडे विक्रीचे काम करत आहे. परंतु सदामने मागील सहा महिन्यांपासून तय्यबच्या पगाराचे पैसे दिलेले नव्हते. त्यामुळे भावाने केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी ताहीर खान हा 31 मे रोजी रात्री साडे अकरा वाजता सदामकडे गेला होता. त्यावेळी सदामने पैसे नंतर देतो, असे सांगताच ताहीर आणि सदाम यांच्या गटात शाब्दिक बाचाबाची होऊन या वादाचे रूपांतर तुफान राड्यात झाले. त्यानंतर दोन्ही गटात हाणामारीसह चाकूहल्ला झाला.
चाकूहल्ल्यात ताहीर आणि सदाम हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी दोन्ही गटातील
5 जणांच्या विरोधात विविध कलमान्वये शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.