

भिवंडी: दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्या कुख्यात साकिब नाचण याचे गाव म्हणून ओळखले जाणारे मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकचे बोरिवली. या गावात पहाटे तीन वाजताच्या सुमारास मुंबई एटीएस पथकाने कॉम्बिंग ऑपरेशन करीत एकूण २२ ठिकाणी छापेमारी केली. या कारवाई वेळी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शना खाली ठाणे ग्रामीण, रायगड ग्रामीण येथील तब्बल ३५० हून अधिक पोलिस कर्मचारी, अधिकारी, शीघ्र कृती दलाच्या जवानांनी संपूर्ण गावाला वेढा दिला होता.
तर मुंबई एटीएस पथकातील सुमारे १०० अधिकारी कर्मचारी यांनी गावातील साकिब नाचणसह इतर अनेक घरात सर्च ऑपरेशन केले. मुंबई एटीएस पथकासह ठाणे, नाशिक येथील २० पथकाने या कारवाई मध्ये सहभाग घेतला होता. पहाटे ३ वाजता सुरू झालेली कारवाई दहा तासांनी दुपारी १ वाजता पूर्ण झाली. या कारवाई मध्ये बोरिवली गावातील साकिब नाचण याच्या घरात जामिनावर असलेल्या आकिब नाचणसह एकूण २२ घरांमध्ये सर्च ऑपरेशन करून तेथील संशयित व्यक्तींचे मोबाईल हॅन्डसेट्स, तलवार, सुरा, मालमत्ते बाबतची संशयास्पद कागदपत्रे व दहशतवाद व चिथावणीखोर उत्तेजना देणारी आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली.
परंतु एटीएस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोणालाही अटक केले नसल्याचे सांगितले. परंतु ज्या संशयित व्यक्तींचे इलेक्ट्रॉनिक साहित्य ताब्यात घेतले आहे त्यामध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यांना एटीएस नोटीस बजावून चौकशीसाठी पाचारण करेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पहाटे पासून सुरू झालेल्या या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पोलिस यंत्रणेकडून पाळण्यात आली होती.
एकूण २२ पथकांमध्ये महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा सुद्धा सहभाग होता. जेणेकरून कोणत्याही घरात महिलांकडून या कारवाईमध्ये अडथळा आणला जाणार नाही याची खबरदारी घेतली होती. ९ डिसेंबर २०२३ रोजी दिल्ली येथील एन एन आय (NNI) पथकाने साकिब नाचण सह गावातील १५ जणांना ताब्यात घेतले होते तर आधी याच गावातून पुणे येथील दहशतवादी मॉड्यूलर मधील तिघाजनांसह साकिब नाचण याचा मुलगा आकिब यास ताब्यात घेत कारवाई केली होती. या कारवाई नंतर सोमवारी पहाटे झालेली ही कारवाई मोठी असून,पुन्हा एकदा बोरिवली येथील दहशतवादी कृत्यांची चर्चा सर्वत्र होत आहे.