

ATS Combing Operation in Bhiwandi
भिवंडी : पुढारी वृत्तसेवा
दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्या इसिसचा भारतातील संशयीत म्होरक्या साकिब नाचण याचे गाव म्हणून ओळखले जाणारे मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा नजीकच्या बोरिवली गाव पुन्हा चर्चेत आले आहे. या गावात पहाटे तीन वाजताच्या सुमारास मुंबई एटीएस पथकाने कोम्बिंग ऑपरेशन करीत एकूण 22 ठिकाणी छापेमारी करत संशयित वस्तू ताब्यात घेतल्या. यावेळी 12 संशयितांना अटक केली आहे. या कारवाईत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. 63 वर्षीय साकिब नाचणने बोरीवली गावाला स्वतंत्र क्षेत्र घोषित करत तेथे आयसीसचा तळ स्थापन केल्याचाही आरोप आहे.
भिवंडी तालुक्यातील पडघानजीक बोरीवली गावात सोमवारी पहाटे 3 वाजता सुरू झालेली कारवाई दहा तासांनी दुपारी 1 वाजता पूर्ण झाली. ठाणे येथे पहाटेपासून दहशतवादाशी संबंधित असलेल्या एका प्रकरणात, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यात छापे टाकून 12 जणांना ताब्यात घेतले आहे, ज्यामध्ये सिमीचे काही माजी पदाधिकारी आणि सदस्यांच्या घरांचा समावेश आहे. एटीएसच्या अधिकार्यांनी साकीब नाचण, आकीब साकीब नाचन, अब्दुल लतीफ साकिब नाचण कोण?
साकिब नाचण प्रतिबंधित स्टूडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचा पदाधिकारी असून दोन दहशतवादी प्रकरणांत दोषी आहे. 2002-2003 मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, विलेपार्ले आणि मुलुंड येथे बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणांत साकिबचा सहभाग असल्याचा आरोप आहे. 2017 मध्ये शिक्षा पूर्ण केल्यानंतर साकिब कट्टरपंथी कारवायांत सहभागी झाल्याचा देखील आरोप आहे. त्यानंतर 9 डिसेंबर 2023 रोजी दिल्ली येथील एनएनआय पथकाने आकिब नाचणसह गावातील 15 जणांना ताब्यात घेतले होते.
साकिब नाचण याने पडघ्याला स्वतंत्र क्षेत्र म्हणून घोषित केले होते असा तपास यंत्रणांचा संशय आहे. अल - शाम म्हणजेच एक प्रकारचा इस्लामिक सीरिया. त्याला पडघ्यात निर्माण करायचा होता, असाही संशय आहे. साकिबने पडघा गावाला ‘अल - शाम’ असे नाव दिले होते. पडघ्यातला तळ मजबूत करण्यासाठी ते मुस्लिम तरुणांना पडघ्यात स्थलांतरित करण्यास प्रेरणा देत होता असा दावा एनआयएने केला.
देशात विघातक कारवाया करणे, सामाजिक तेढ निर्माण करणे, भारत सरकारविरोधात लढा पुकारणे अशी योजना या मॉड्यूलच्या माध्यमातून होत होती. यापूर्वी पडघा गावातून एनआयएने मागिल वर्षी ऑगस्ट महिन्यात साकिब याच्या मुलाला अटक केली होती.