

नेवाळी: अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगड परिसरात पर्यटकांच्या वाढत्या स्टंटबाजी आणि भरधाव वाहनचालकांमुळे स्थानिक नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. रविवारी सायंकाळी खरड ते कुशीवली मार्गावर झालेल्या भीषण अपघाताने या गंभीर समस्येची पुन्हा एकदा प्रचिती दिसून आली आहे. मलंगगडडून अति वेगाने खाली येणाऱ्या दुचाकीस्वाराने समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. उपस्थित पर्यटकांनी जखमींना तातडीने जखमींना उचलून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
या अपघातात दुचाकीवरील एक लहान बालक सुदैवाने थोडक्यात बचावल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र काही क्षणांचा हा थरार पाहून परिसरातील नागरिक हादरले आहेत. श्री मलंगगड परिसरात प्रत्येक शनिवार - रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक येतात.
त्यापैकी काही जण भरधाव वेगाने वाहन चालवणे, स्टंटबाजी करणे, धोकादायक ओव्हरटेक करणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार सर्रास करत असल्याची तक्रार स्थानिकांकडून सातत्याने केली जात आहेत. याचा फटका मात्र रोजच्या प्रवासासाठी हा मार्ग वापरणाऱ्या सामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि स्थानिक वाहनचालकांना बसत आहे.
भरधाव वाहनांवर कठोर कारवाईची मागणी
वारंवार घडणाऱ्या अशा घटनांनंतरही संबंधित यंत्रणेकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मलंगगड मार्गावर वाहतूक पोलिसांची नियमित गस्त, भरधाव वाहनांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
मात्र अपुरं पोलिसांचं मनुष्यबळ आणि शनिवार रविवारी दरवर्षी प्रमाणे पोलिसांच्या लागणाऱ्या नाका बंदी यंदा दिसून येत नसल्याने तरुणाईचे स्टंटबाजीचे व्हिडिओ बनवताना अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष देणं अत्यंत गरजेचं झालं आहे.अन्यथा पर्यटकांच्या बेफाम वेगाची किंमत निरपराध नागरिकांना जीव गमावून मोजावी लागेल,अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे.