

पालघर: जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या दमदार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा निर्माण झाला असून, जिल्ह्यासह मुंबई महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याची चिंता जवळपास संपुष्टात आली आहे.
तानसा आणि मोडकसागर ही दोन्ही धरणे शंभर टक्के भरली असून, सूर्या, कवडास, वाघ, तसेच मध्य वैतरणा धरणातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आगामी काळातील पिण्याच्या पाण्याबाबत मोठा दिलासा मिळाला आहे.
पालघर पाटबंधारे विभागाच्या रविवारी सकाळी ७ वाजताच्या अहवालानुसार, तानसा धरण १०० टक्के, मोडकसागर धरण १०० टक्के, सूर्या धरण ७५.०२ टक्के, कवडास धरण ४४.७८ टक्के, वाघ धरण १०० टक्के, कुर्डे धरण ४२.५४ टक्के, तर मध्य वैतरणा धरण ९८.९१ टक्के भरले आहे. धरणांतील जलसाठा वेगाने वाढल्याने पाणीपुरवठ्याची चिंता दूर झाली आहे.
धरणांमध्ये जलसाठा वाढल्याने काही धरणांतून नियंत्रित स्वरूपात विसर्ग सुरू आहे. धामणी धरणातून १,५४२ क्युसेक्स, कवडास बंधाऱ्यातून २६,६९२ क्युसेक्स, वाघ धरणातून ४८५ क्युसेक्स, कुर्डे धरणातून ४९२ क्युसेक्स, तानसा धरणातून ६६,३३२ क्युसेक्स, तर मोडकसागर धरणातून २०,४८४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची परिस्थितीही सध्या नियंत्रणात आहे. सूर्या नदी (मासवण), वैतरणा, पिंजाळ आणि देहरजा या सर्व नद्यांची पाणीपातळी धोक्याच्या पातळीपेक्षा कमी असून, कोणत्याही नदीने इशारा किंवा धोका पातळी ओलांडलेली नाही. त्यामुळे सध्या मोठ्या पूरस्थितीचा धोका नसला तरी सतत पडणारा पाऊस लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
एकीकडे धरणे भरल्याने वर्षभराच्या पाणीपुरवठ्याची चिंता दूर झाली असली, तरी दुसरीकडे धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी तसेच पर्यटकांनी नदीपात्र, धबधबे आणि सांडव्याजवळ जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
धरणांतील जलसाठा एका नजरेत
तानसा १००%
मोडकसागर १००%
मध्य वैतरणा ९८.९१%
सूर्या ७५.०२%
कवडास ४४.७८%
कुर्डे ४२.५४%
वाघ १००%
नद्यांची सद्यस्थिती
सूर्या (मासवण) – धोका पातळीखाली
वैतरणा – धोका पातळीखाली
पिंजाळ – धोका पातळीखाली
देहरजा – धोका पातळीखाली