

ठाणे : सात दिवसांच्या स्त्री बाळाची सहा लाखात विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंध पथकाने बेड्या ठोकल्या. आरोपींच्या ताब्यातून सदर बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
बदलापूर शहरात राहणाऱ्या एका दलाल महिलेसह काही जणांची टोळी नवजात बाळांंची इंस्टाग्राम, युट्युबवर फोटो व व्हिडीओ अपलोड करून विक्री करत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंध पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांना मिळाली होती. माहितीची शहानिशा करून पोलीस पथकाने एक बनावट ग्राहक पाठवून सदर टोळीशी संपर्क केला होता.
दरम्यान या टोळीतील एका पुरुष दलालाने 20 व 21 डिसेंबर रोजी पोलिसांनी तयार केलेल्या बनावट ग्राहकाशी संपर्क साधून त्यांच्याकडे एक स्त्री जातीचे बाळ विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. या बाळासाठी सहा लाख रुपये द्यावे लागतील, असेही दलालाने बनावट ग्राहकास सांगितले. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे बनावट ग्राहकाने या टोळीस बाळ खरेदी करण्यास संमती दर्शवली.
त्यानंतर या पुरुषाने ठरलेल्या रकमेपैकी 20 हजार रुपये ऑनलाइन स्वीकारले व स्त्री जातीचे नवजात बाळ देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर 23 डिसेंबर रोजी बदलापूर येथील रेस्टॉरंट समोर, बदलापूर येथे बाळास घेऊन ही टोळी आली. यावेळी पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना सापळा लावून अटक करत बाळाची सुखरूप सुटका केली.
शेखर संभाजी मनोहर (वय 36), रेश्मा शहाबुद्दीन शेख (वय 35), आसिफ चांद खान (वय 27), नितीन संभाजी मनोहर (वय 33), शेखर गणेश जाधव (वय 35) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या टोळीतील सहावी आरोपी महिला ही फरार असून तिचा शोध पोलीस घेत आहेत. या टोळीच्या ताब्यातून बाळाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली असून या बाळास डोंबिवली येथील बालगृहात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणे अनैतिक वाहतूक प्रतिबंध पथक करीत आहेत.
सोशल मीडिया चॅनेलचा वापर
मूल दत्तक देण्याच्या नावाखाली नवजात बाळाची विक्री करणाऱ्या या टोळीने इन्स्टाग्राम व युट्युबवर स्वतंत्र चॅनेल बनवले होते. या चॅनेलवर ही टोळी नवजात बाळांचे फोटो व व्हीडिओ अपलोड करून ग्राहक हेरत होते व बाळ विक्री करत होते, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. बाळ अपहरण करून आणण्यात येत होती की त्यांच्या पालकांच्या संमतीने विक्री करण्यात येत होती, याचा तपास पोलीस करीत आहेत.