

मुंबई : कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य घालण्यास उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने दादर येथील नितीन शेठ या 52 वर्षीय व्यावसायिकाला वांद्रे येथील महानगर न्यायालयाने दोषी ठरवत पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात ही पहिलीच शिक्षा आहे.
कबुतरखाना आणि कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्याचा मुद्दा मुंबईमध्ये मागील काही महिन्यांपासून चांगलाच चर्चेत आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने जुलैमध्ये कबुतरांना खायला देण्यास बंदी घातली. मात्र अनेक ठिकाणी या आदेशाचे उल्लंघन होत आहे.
हिंदुजा रुग्णालयाजवळील एलजे रोडवरील कबुतरखान्याजवळ नितीन शेठ या व्यापाऱ्याने कबुतरांना खायला दिल्याबद्दल माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एका महिन्याच्या आत पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले.
कार्यवाही दरम्यान, शेठने आरोपांसाठी दोषी असल्याचे कबूल केले. त्यामुळे वांद्रे येथील नवव्या न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. यू. मिसाळ यांनी शेठ यांना भारतीय न्याय संहिता (बीएनएस), 2023 च्या कलम 223 (ब) आणि 271 अंतर्गत दोषी ठरवले.
या बंदीच्या नियमानुसार आता पहिल्याच व्यक्तीला ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे कबुतरप्रेमी आणि विरोधक पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत.
काय शिक्षा झाली ?
ज्या कलमानुसार ही कारवाई करण्यात आली त्यानुसार सार्वजनिक सेवकाच्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करणे आणि जीवघेण्या कोणत्याही आजारांचा संसर्ग पसरवण्याची शक्यता असल्याची कृती करणे, या दोन्ही गुन्ह्यांवर अनुक्रमे 3 हजार रुपये आणि 2 हजार रुपये दंड ठोठावला. एकूण पाच हजार रुपये या आरोपीला दंड म्हणून भरावे लागणार आहेत.