

डोंबिवली : डोंबिवली जवळच्या आजदे गावानंतर खंबाळपाडा परिसरात अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडल्या आहेत. मण्यार सापाच्या दंशामुळे 4 वर्षीय भाची प्राणवीनंतर ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात उपचाराधीन असलेली मावशी बबली ऊर्फ श्रुती हिचा देखील मृत्यू झाला. प्राणवीच्या दुःखाचे सावट कायम असतानाच तिची 23 वर्षीय मावशी बबलीवरही काळाने घाला घातल्याचे वृत्त डोंबिवलीत येऊन आदळताच भोईर आणि ठाकूर कुटुंबीयांवर दुःखाचा पहाड कोसळला आहे.
केडीएमसीच्या रुग्णालयात वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने या दोघींना जीव गमावावा लागल्याचा गंभीर आरोप भोईर आणि ठाकूर कुटुंबीयांनी केला आहे. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी थेट केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकार्यास धारेवर धरले आणि जाब विचारत यावेळी ठिय्या आंदोलन केले.
सर्पदंश झालेल्या रुग्णावर वेळीच आणि योग्य पद्धतीने उपचार केले जात नाहीत. इंजेक्शन उपलब्ध का नसतात? असली तरीही कोणत्या जातीच्या सर्पाच्या चाव्याला उपलब्ध इंजेक्शनचा प्रभाव पडणार आहे का? तसेच असे आणखी किती बळी घेतले जाणार आहेत? अशा शेकडो प्रश्नांची सरबत्ती करून आंदोलनकर्त्या संतप्त नातलगांनी उपस्थित अधिकार्यांना या घटनेप्रकरणी धारेवर धरले. यावेळी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.
दरम्यान आजदे गावातील भागीरथी अपार्टमेंटमधील विक्की भोईर यांची 4 वर्षांची मुलगी प्राणवी तिच्या आईसोबत काही किमी अंतरावरील खंबाळपाडा येथे माहेरी गेली होती. रात्री प्राणवी तिची मावशी श्रुतीजवळ झोपली असताना पहाटे झोपेत असलेल्या प्राणवीला अचानक सर्पदंश झाल्याने ती जोरजोरात रडू लागली. तिच्या रडण्याने मावशीही जागी झाली. मावशीने प्राणवीला तिच्या आईजवळ दिले. तिच्या रडण्याचे कारण कुणालाही समजत नव्हते. काही वेळातच त्याच सापाने बबलीलाही दंश केला. तेव्हा प्राणवीलाही सापानेच चावा घेतला असावा, असे घरच्यांच्या लक्षात आले.
पुढच्या महिन्यात होणार होता विवाह...
दुर्दैवी प्राणवीची मावशी बबली ऊर्फ श्रुतीवर ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. नातेवाईकांनी बबलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी खंबाळपाड्यात आणला. तिचा मृतदेह पाहून तिच्या आई-वडिलांसह उपस्थित नातलगांनी हंबरडा फोडला. बबलीचे पुढच्या महिन्यात लग्न होणार होते. घरात आनंदाचे वातावरण होते. लग्नाची तयारी देखील सुरू होती. मात्र बबलीच्या मृत्यूमुळे मंगलमय वातावरण असलेल्या ठाकूर कुटुंबीयांच्या घरावर दु:खाचे सावट पसरले आहे.
आरोग्य अधिकार्यांच्या दालनातच ठिय्या...
कुटुंबीयांनी तातडीने प्राणवी आणि तिची मावशी बबली उर्फ श्रुतीला डोंबिवलीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी सुरुवातीला दोघींचीही प्रकृती व्यवस्थित असल्याचा दावा केला. मात्र तासाभराच्या उपचारानंतर प्राणवीची प्रकृती अचानक बिघडली. परिस्थिती गंभीर झाल्याचे पाहून कुटुंबीयांनी तिला पुढील उपचारासाठी दुसर्या रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र दुर्दैवाने रुग्णालयातून हलविण्यापूर्वीच रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच प्राणवीची प्राणज्योत मालवली. काळाने घाला घातलेल्या गोंडस बाळाच्या अकाली जाण्याने भोईर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रहिवाशांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी मुख्य आरोग्य अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले.