

ठाणे : ठाणे शहरातील बाजारपेठेत मोरपिसांची बेकायदेशीर विक्री करत असताना 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून एकूण 300 मोरपिसे जप्त करण्यात आली. ठाणे नगर पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याच्यावर कारवाई केली. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
प्राथमिक चौकशीत या मुलाकडे मोरपिसांची विक्री करण्यासाठी कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अंतर्गत मोर हा अनुसूची-1 मधील संरक्षित पक्षी आहे. त्यामुळे त्याचे पिसे विकणे, खरेदी करणे किंवा साठवणे हा कायद्याने गुन्हा आहे. या अधिनियमानुसार संबंधित अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला भिवंडी येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने त्यास बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास वनक्षेत्रपाल, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपासात अल्पवयीन मुलाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मोरपिसांची विक्री केली जात असल्याचे संकेत मिळाले आहेत. या प्रकरणामागे एखादे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलिस आणि वन विभाग दोन्ही यंत्रणांनी तपासाची दिशा त्या दिशेने वळवली आहे.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोरपिसांची विक्रीवर नजर
दरम्यान, यापूर्वीही काही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोरपिसांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले होते. सध्या डिजिटल ट्रॅकिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशा प्रकारच्या ऑनलाइन व्यवहारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. अल्पवयीन मुलांच्या माध्यमातून होणारी वन्यजीव तस्करी ही अधिक चिंतेची बाब बनत असून, संबंधित यंत्रणांनी याविरोधात कठोर कारवाईची गरज व्यक्त केली आहे.