Siddheshwar Express Gold Theft: सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये साडे पाच कोटींचे सोने असलेली बॅग गायब; रेल्वे पोलिसांत गुन्हा
कल्याण : सिद्धेश्वर एक्सप्रेस ने सोलापूर हून मुंबई ला प्रवास करणाऱ्या मुंबईतील सोन्या चांदीचा बड्या व्यापाऱ्याची साडे पाच कोटी रुपयाच्या सोन्याने भरलेली बँग अज्ञात चोरट्याने सोलापूर कल्याण रेल्वे प्रवासा दरम्यान लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव येथे राहणारे सोन्या चांदीचे व्यापारी अभयकुमार जैन हे सोलापूरला गेले होते. सोलापूरहून मुंबईच्या दिशेने येण्यासाठी त्यांनी ६ डिसेंबरला सिद्धेश्वर एक्सप्रेस पकडली होती. त्याचे एसी कोचचे तिकीट होते. एसी कोचने ते प्रवास करीत होते. त्यांच्याकडे साडे पाच कोटी रुपये किंमीतीचे सोन्याने भरलेली बॅग होती.
त्यांनी ती बॅग लॉक करुन कोचच्या खाली ठेवली होती. प्रवासा दरम्यान ते झोपी गेले. पहाटेच्या सुमारास गाडी कल्याणला पोहचली. तेव्हा अभयकुमार जैन यांना जाग आली होती. त्यांनी उठताच त्यांना कोचखाली ठेवलेली सोन्याची बॅग गायब असल्याचे दिसून आले. साडे पाच कोटी रुपये किंमतीची सोन्याने भरलेली बॅग लंपास झाल्याचे कळताच अभयकुमार जैन यांना मोठा धक्का बसला.
त्यांनी तात्काळ तिकीट तपासनीस विक्रम वीणा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी घडला प्रकार वीणा यांना सांगितला. तसेच रेल्वेची ही मदत घेतली. सोन्याची बॅग चाेरीला गेल्याची बाब त्यांना कल्याण रेल्वे स्थानकाजवळ गाडी आल्यावर कळाल्याने या प्रकरणी त्यांनी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

