

ठाणे : गोवा येथील क्लबमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील शाळा-महाविद्यालये, हॉटेल, क्लब, मॉल, आयटी पार्क आणि सरकारी कार्यालयांचे फायर ऑडिट करावे. तसेच सध्या फायर एनओसी नसलेल्या आस्थापनांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
गोवा येथील क्लबमध्ये लागलेल्या आगीची घटना पाहून, ठाणे शहरातही सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी ठाणे शहरातही हॉटेलला लागलेल्या आगीत काही ग्राहकांचा मृत्यू झाला होता. तर कापूरबावडी येथील वाणिज्य इमारत आगीत खाक झाली होती. वाढत्या अतिक्रमणांमुळे ठाणे शहरातील काही भागात अग्निशमन दलाची गाडी पोहचू शकत नाही, अशी स्थिती आहे, याकडे नारायण पवार यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
ठाणे शहरात अनेक क्लब सुरू झाले आहेत. जुन्या इमारतीच्या वा जागेच्या स्ट्रक्चरमध्ये बदल करून बहुतांशी क्लब उभारण्यात आले आहेत. शहरातील मॉल व हॉटेलांमध्येही शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अनेक मॉलमध्ये मोकळ्या जागांच्या ठिकाणी छोटी दुकाने सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर शाळा-महाविद्यालये, मोठे हॉस्पिटल, नर्सिंग होममध्येही अग्निसुरक्षा बाळगण्याची गरज आहे. महापालिका मुख्यालयाबरोबरच प्रभाग समितीची कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालयांमध्येही ये-जा करण्यासाठी जिने, आपत्कालीन मार्ग आदींची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे नारायण पवार यांनी सांगितले.