

डोंबिवली : मृत्यूनंतर मृतदेहांची अवहेलना होणार आहे हे माहित असूनही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. नूतनीकरणाच्या नावाखाली स्मशानभूमी बंद करण्यात आली असली तरी ती सुरू होण्यापर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही. त्यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणल्या जाणाऱ्या मृतदेहांनी मृत्यूनंतरही हालअपेष्टा सोसायच्या का ? आदी प्रश्नांची सरबत्ती करून राजसैनिकांनी उपस्थित अधिकाऱ्यांना भंडावून सोडले. परिणामी राजसैनिकांच्या आक्रमक पावित्र्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांची उत्तरे देताना दमछाक झाली होती.
नूतनीकरणाच्या नावाखाली डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर स्मशानभूमी बंद करण्याचा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने केडीएमसी प्रशासनाच्या विरोधात तिव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी केडीएमसीचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार, तर माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष राहूल कामत, उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील, विधानसभा सचिव अरूण जांभळे, उपशहराध्यक्ष राजू पाटील, प्रेम पाटील, दिपक शिंदे, विभागाध्यक्ष चेतन म्हात्रे, संजय चव्हाण, ऋतिकेश गवळी, कदम भोईर, डोंबिवलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मशानभूमीत मृत्यूनंतरही मरणयातना भोगाव्या लागत असेल तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने घेतलेला नूतनीकरणाचा निर्णय योग्य आहे का ? असा सवाल राजसैनिकांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विचारला. प्रशासनाकडून ज्या स्मशानभूमींच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत तिथे प्राथमिक सुविधांची पूर्तता न केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत मनसेने यावर तिव्र प्रतिक्रिया दिली. शिवमंदिर मोक्षधाम स्मशानभूमी नुतनीकरणासाठी पूर्ण बंद करण्यापूर्वी शहरातील इतर स्मशानभूम्यांमध्ये सुविधांसह २४ तास कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
शिवमंदिर स्मशानभूमी बंद झाल्यापासून सुरू होण्यापर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही. तो कालावधी आधी निश्चित करावा. हे सर्व जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सदरची स्मशानभूमी बंद करू नये. ही स्मशानभूमी पुढील चर्चेनंतरच बंद होईल, अशी माहिती प्रशासनातर्फे अधिकाऱ्यांनी दिली. मात्र इतर कोणत्याही कारणास्तव शिवमंदिर मोक्षधाम स्मशानभूमी कायमची बंद करण्याचा घाट घातला तर गाठ आमच्याशी आहे, अशी ताकीद उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
पाथर्लीनंतरच शिवमंदिर मोक्षधामाचे काम सुरू
डोंबिवलीतील स्मशानभूमी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच असल्या तरी मोजक्याच स्मशानभूमींचाा वापर केला जात आहे. यात शिवमंदिर रोडला असलेल्या मोक्षधाम आणि कल्याण रोडला असलेल्या पाथर्ली अशा दोन स्मशानभूमींचा समावेश आहे. वाढती लोकसंख्या पाहता नवीन स्मशानभूमींची बांधणी आणि सुस्थितीत नसलेेल्या स्मशानभूम्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय केडीएमसी प्रशासनाने घेतला आहे. पाथर्ली स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर तेथे मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी खुली केल्यानंतर शिवमंदिर मोक्षधाम स्मशानभूमीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी सोमवारपासून ही स्मशानभूमी बंद करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले