

Gangster Arrested Dombivli
डोंबिवली : विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तांनी ठाणे, मुंबई उपनगरे आणि रायगड जिल्ह्यातून तडीपार केलेला श्रीराम शांताराम राठोड (२५) हा डोंबिवली जवळच्या पिसवली गावातील टाटा पाॅवर भागात राहणारा कुख्यात गुंड पोलिसांची नजर चुकवून डोंबिवलीत दाखल झाला होता. हा गुंड हातात कोयता घेऊन टाटा पाॅवर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान रस्त्यावर वाहनचालकांसह पादचाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत होता. क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने या गुंडाला कोयत्यासह रंगेहाथ बेड्या ठोकल्या आहेत. जवळपास अर्धा तास पोलिस आणि गुंडात जोरदार धुमश्चक्री झाली. अखेर या गुंडाच्या मुसक्या आवळण्यात क्राईम ब्रँचला यश आले.
कल्याण-शिळ महामार्गावरील पिसवली गाव परिसरासह टाटा पाॅवर भागात श्रीराम राठोड याची शस्त्राच्या जोरावर प्रचंड दहशत होती. त्याच्या विरोधात गुन्ह्यांची मालिका होती. परिसरातील रहिवासी, व्यापारी आणि दुकानदार त्रस्त झाले होते. या गुंडाच्या गुंड वाढत्या तक्रारी येऊ लागल्याने त्याचा उन्माद थांबविण्यासाठी, तसेच स्थानिकांना भयमुक्त जीवन जगता यावे यासाठी स्थानिक पोलिसांनी त्याला तडीपार करण्या विषयीचा अहवाल वरिष्ठांना पाठविला होता. या अहवालावरून विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तांनी त्याला ५ डिसेंबर २०२४ पासून ठाणे, मुंबई, उपनगरे आणि रायगड जिल्ह्यातून हद्दपार केले होते.
तरीही पोलिसांची नजर चुकवून राहते घर असलेल्या टाटा पाॅवर परिसरात चोरी-छुपे वावरत होता. गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास या गुंडाने कहर केला. धारदार कोयता हातात घेऊन बाहेर पडलेला हा गुंड पिसवलीतील टाटा पाॅवर नाक्यापासून डोंबिवलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्यावर फिरून पादचाऱ्यांना धाक दाखवत त्यांच्या अंगावर धाऊ लागला. वाहनांना आडवे येऊन चालकांना धमकावू लागला. ही माहिती खासगी गुप्तहेरांकडून मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांनी या भागात पेट्रोलिंग करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, हवालदार प्रवीण किनरे, सुदाम जाधव, गुरूनाथ जरग यांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या पथकाने टाटा पॉवर ते डोंबिवलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान सार्वजनिक रस्त्यावर दहशत माजविणारा गुंड श्रीराम राठोड याला पकडण्याचा प्रयत्न केला.
तथापी उन्मत्त झालेला हा गुंड काहीकेल्या हाती लागत नव्हता. पोलिसांनी मोठ्या कौशल्याने या गुंडाला जेरबंद करण्यात यश मिळविले. एकीकडे हा सारा प्रकार भर रस्त्यात सुरू असताना दुसरीकडे स्थानिक पोलिस मात्र या घटनेपासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
गुंडाच्या हातात धारदार कोयता होता. त्यामुळे अंगावर थेट गेल्यास हल्ला करून तो पळून जाण्याची शक्यता होती. प्रसंगावधान राखून पोलिसांनी त्याला चारही बाजूंनी घेरले. गाफील ठेऊन या गुंडावर एकावेळी अचानक झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून १७ इंची लांबीचा कोयता काढून घेण्यात आला. त्याच्या अटकेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. सार्वजनिक शस्त्र वापरण्यास जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी मनाई आदेश जारी केले आहे. या आदेशांसह हद्दपारीच्या आदेशांचे उल्लंघन करून शस्त्राच्या जोरावर दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या गुंडाला मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणी त्याच्या विरोधात हवालदार प्रवीण किनरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय हत्यार कायद्याचे कलम ४, २५ सह महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम १४२, ३७ (१), १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.