

उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडीपार असतानाही विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुंडाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्याच्या कडून एक पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे.
उल्हासनगर कॅम्प 4 मधील मद्रासी पाडा येथे राहणारा अविनाश नायडू हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आधीपासूनच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे जुलै 2024 मध्ये त्याच्यावर दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, हद्दपारी आदेशाचा भंग करून तो विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत असल्याची माहिती पोलीस अंमलदार मंगेश वीर यांना मिळाली.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कुलकर्णी, पोलिस अंमलदार योगेश सानप, मंगेश वीर, दिपक पाटील, चंद्रकांत गायकवाड, प्रदीप बुरकुल यांच्या पथकाने सापळा रचून नायडू याला ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल आढळून आले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम व हद्दपारी आदेश भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे.